पुणे (Pune) : पुणे महापालिकेचे (PMC) उपायुक्त माधव जगताप यांच्या नियुक्तीची फाइलच गायब झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता ही फाइल कोणाकडे आहे का, असेल तर ती सामान्य प्रशासन विभागाला द्यावी, असे आवाहन करण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढवली आहे.
जगताप यापूर्वी अनेक वर्षे अतिक्रमण निर्मूलन विभागात व त्यानंतर काही काळ मिळकतकर विभागात कार्यरत होते. त्यांची नुकतीच परिमंडळ एकच्या उपायुक्तपदाची बदली झाली. त्यांच्या कार्यकाळातील निर्णयांचा तपशील मिळविण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा वापर करण्यात आला आहे. त्यात त्यांच्या नियुक्तीसंदर्भातील पत्राचाही समावेश आहे.
जगताप यांची नियुक्ती अनुकंपा तत्त्वावर झाली होती. त्याची माहिती मागविण्यात आली आहे, पण सामान्य प्रशासन विभागाला ही फाइलच सापडत नाही. त्यामुळे या विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी सर्व विभागांचे खातेप्रमुख, विभाग प्रमुख, सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त यांना पत्र लिहून ही फाइल आहे का ते तपासावे, असेल तर ती उपलब्ध करून द्यावी, असे कळविले आहे. ही माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
महापालिकेने हजारो कोटींच्या टेंडर प्रक्रियांसाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. बांधकाम परवान्यांसाठीही सॉफ्टवेअर तयार करण्यात आले, पण महापालिकेच्या सेवकांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे जतन करण्यासाठी प्रशासनाने काहीही केलेले नाही.
एका दिवसात खाते काढून घेतले
उपायुक्त जगताप यांच्याकडे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी देण्यात आली होती, पण हे खाते एका दिवसातच त्यांच्याकडून काढून घेण्यात आले. हा विभाग उपायुक्त संदीप खलाटे यांच्याकडे देण्यात आला.
खलाटे यांना एकतानगरी येथे पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर मदतकार्यास उशीर केल्यावरून तत्कालीन आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांना निलंबित केले होते. कालांतराने त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. आता त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.