PMC
PMC Tendernama
पुणे

Pune: अवघ्या 3 महिन्यांत नव्या कोऱ्या रस्त्यात भलामोठा खड्डा कसा?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांचे डांबरीकरण केले जात असून, तीन वर्षे या रस्त्यांचा ‘दोष दायित्व कालावधी’ (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड - DLP) आहे. मात्र, अवघ्या तीन महिन्यांतच रस्त्याच्या मध्यभागी खड्डा पडल्याचा प्रकार धायरी येथे घडला आहे. त्यामुळे आता संबंधित ठेकेदार (Contractor), सल्लागारावर महापालिका (PMC) काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने महापालिकेने ३०० कोटी रुपये खर्च करून १०० किलोमीटर लांबीचे रस्ते डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एक ते पाच असे पॅकेज करून त्यामध्ये रस्त्यांची विभागांनी केलेली आहे. त्यातील पॅकेज दोन, तीनमधील बुहतांश कामे पूर्ण होत आली आहेत. तर पावसाळ्यामुळे पॅकेज एक, चार व पाचची कामे संथ गतीने सुरू आहेत.

पॅकेज दोनमध्ये धायरी येथील धायरी फाटा ते गारमळा असा सुमारे अर्ध्या किलोमीटरचा रस्ता मार्च महिन्यात डांबरीकरण केला आहे तर गारमळा ते उंबऱ्या गणपती या रस्त्यावर सर्वाधिक खड्डे असूनही या भागातील कामे केलेले नाही.

पथ विभागाने डांबरीकरण केल्यानंतर यशवंत विहार कॉप्लेक्सच्या समोर जून महिन्यात मोठा खड्डा पडला. महापालिका प्रशासनाचे त्यानंतर त्याकडे लक्ष गेले नाही, पण यासंदर्भात ऑनलाइन तक्रार दाखल झाल्यानंतर डांबर टाकून हा खड्डा बुजविण्यात आला आहे. पण आता त्यावरही खड्डे पडत आहे.

देखभाल दुरुस्तीसाठी सल्लागार

ठेकेदाराने रस्ता केल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती, दर्जा तपासण्यासाठी महापालिकेने सल्लागार नियुक्त केला आहे. पण आता फक्त तीन महिन्यांत खड्डा पडल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहेत. तसेच या रस्त्याच्या कामाची त्रयस्थ संस्थेने देखील तपासणी केली आहे. तरीही रस्ता लगेच खचल्याने तपासणीवरही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पॅकेजमध्ये काम केलेल्या रस्‍त्यांचा ‘डीएलपी’ तीन वर्षांचा आहे. धायरी येथे रस्त्याला पडलेल्या खड्ड्याबाबत तपासणी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग