SPPU Chowk Double Decker Flyover Tendernama
पुणे

पुण्यातील पहिल्याच डबल डेकर पुलाचा मुहूर्त पुन्हा पुढे ढकलला; काय आहे कारण?

Pune : विद्यापीठ चौकातील उड्डाण पुलाच्या कामालाहा पुन्हा ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळील (SPPU) आनंद ऋषीजी महाराज चौकातील उड्डाण पुलाच्या कामाला आता ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या उड्डाण पुलावर वाहनांसाठीच्या लेनवरती मेट्रोचे स्थानक असणार आहे. अशा प्रकारची रचना असलेला हा पुणे शहरातील पहिलाच ‘डबल डेकर’ पूल आहे. (SPPU Chowk Double Decker Flyover News)

हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोच्या पूर्णत्वास आता पुढील वर्षाचा मार्च महिन्याचा मुहूर्त मिळाला आहे. या मेट्रो प्रकल्पाला तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. सध्या या प्रकल्पाचे काम सुमारे ८४ टक्के पूर्ण झाले आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हाती घेतले आहे. त्यांच्या ‘ट्रिल अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स’ यांचा समावेश असलेल्या ‘कन्सोर्टियम’ला प्रदान करण्यात आला आहे.

प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ (पीआयटीसीएमआरएल) या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीने ‘पीएमआरडीए’मार्फत मुदतवाढीसाठी मागणी केली होती. त्यास राज्य सरकारच्या कार्यकारी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. आता हा मेट्रो प्रकल्प पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती ‘पीएमआरडीए’चे आयुक्त योगेश म्हसे पाटील यांनी सांगितले.

या मेट्रो मार्गाचे काम मार्च २०२५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यानंतर सप्टेंबर २०२५ची मुदत देण्यात आली. आता तिसऱ्यांदा मार्च २०२६ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुदतवाढीसाठी कारणे
- भूसंपादनातील विलंब
- गणेश खिंड रस्त्यावर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या ये-जामुळे विलंब
- सेवा रस्त्यावरील सर्व्हिस लाइन स्थलांतरित करण्यास झालेला उशीर
- खडी पुरवठा पुरवठादारांचे आंदोलन
- विविध प्रशासकीय परवानग्या मिळण्यात झालेला विलंब

दृष्टिक्षेपात
- २३ किलोमीटर हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो
- संपूर्ण उन्नत (एलिव्हेटेड) प्रकल्पाचे वैशिष्ट्ये
- सात हजार ४२० कोटी रुपये खर्च
- या मार्गावर २३ स्थानके होणार