पुणे (Pune) : उच्चसुरक्षा नंबर प्लेटला (HSRP) वाहनधारकांचा प्रतिसाद वाढावा या हेतूने प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) व संबंधित कंपनीने समूह आरक्षण (ग्रुप बुकिंग) करणाऱ्यांना ही नंबर प्लेट घरपोच देण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवाय त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. घरपोच सेवा ही पूर्णपणे मोफत असेल. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. समूह आरक्षणासाठी वाहनांची संख्या किमान २५ असणे अनिवार्य आहे.
उच्चसुरक्षा नंबर प्लेटच्या नोंदणीत येणाऱ्या अडचणी, वाहनधारकांमध्ये उदासीनता आदी विविध कारणांमुळे पुण्यासह राज्यात नंबर प्लेट बसविण्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे. पुण्यात सुमारे २६ लाख वाहनांना उच्चसुरक्षा नंबर प्लेट बसविणे अनिवार्य आहे. मात्र ९ मार्च २०२५ च्या आकडेवारीनुसार आतापर्यंत केवळ सुमारे ३२ हजार वाहनांनाच अशा नंबर प्लेट बसविण्यात आल्या आहेत. हे प्रमाण अतिशय कमी आहे.
शिवाय नंबर प्लेट लावण्यासाठी दिलेली मुदत संपण्यासाठीदेखील केवळ दीड महिना आहे. त्यामुळे कमी दिवसांत जास्त वाहनांना नंबर प्लेट बसविण्याचे आव्हान ‘आरटीओ’समोर आहे. हे लक्षात घेऊनच समूह आरक्षणाची संकल्पना अमलात आणली जात आहे.
सध्या नंबर प्लेटची घरपोच सेवा हवी असेल, तर त्यासाठी वाहनधारकाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. दुचाकीसाठी १२५ रुपये व चारचाकीसाठी २५० रुपयांचे शुल्क आकारले जाते. मात्र समूह आरक्षण केल्यास वाहनधारकांना घरबसल्या उच्चसुरक्षा नंबर प्लेट येईल, शिवाय त्यासाठी शुल्क द्यावे लागणार नाही.
उच्चसुरक्षा नंबर प्लेटसाठी ‘समूह आरक्षण’ करणाऱ्या वाहनधारकांना संबंधित कंपनीचे कर्मचारी थेट घरी अथवा दिलेल्या पत्त्यावर नंबर प्लेट देतील. त्यासाठी त्याच्याकडून शुल्क घेतले जाणार नाही. ही सेवा पूर्णपणे मोफत असेल. यासंबंधी सर्वच कंपन्यांच्या प्रतिनिधींना आदेश दिले आहेत.
- स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
नंबर प्लेट अनिवार्य असलेली वाहने
- २६ लाख
आतापर्यंत प्लेट बसवलेली वाहने
- ३२ हजार
दुचाकीसाठी
- १२५ रुपये
चारचाकीसाठी
- २५० रुपये