पुणे (Pune) : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (Hinjawali - Shivajinagar Metro) मार्गासाठी आवश्यक असलेल्या जागेचे भूसंपादन शंभर टक्के झाले आहे. प्रकल्पाचे काम ८३ टक्के पूर्ण झाले आहे, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए - PMRDA) देण्यात आली.
प्राधिकरणाने शासनाच्या मान्यतेने पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कंपनीशी सवलत करारनामा केला आहे. यानुसार प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या सर्व जागा मेट्रो प्रकल्प बांधकामासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे प्राधिकरणाने आवश्यक जागा या मेट्रो सवलतकार कंपनीस उपलब्ध करून दिली आहे.
राजभवन आवारातील पुणे विद्यापीठ बाजूकडील २६३.७८ चौरस मीटर जागा जिना बांधकामासाठी आवश्यक होती. संबंधित जागा हस्तांतर करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणामार्फत राजभवन कार्यालयास नोव्हेंबर २०२२ मध्ये सादर केला होता.
त्यानुसार मेट्रो जिन्यासाठी आवश्यक असलेली जागा हस्तांतर करण्यास राजभवन कार्यालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे एकूण १०० टक्के जागा ताब्यात आली आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर भाले यांनी दिली.