पिंपरी (Pimpri) : शहराला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय हवे, अशा लोकप्रतिनिधींसह नागरिकांच्या मागणीच्या रेट्यानंतर पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय अस्तित्वात आले. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासालाही वेग आला. मात्र, आयुक्तालय स्थापन होऊन सहा वर्षे उलटली तरी अद्यापही हक्काची स्वतंत्र इमारत उपलब्ध झालेली नाही. मुख्यालयालाही प्रशस्त जागा मिळेना. आयुक्तालय व मुख्यालयाचे कामकाज सध्या भाडेतत्त्वावरील इमारतीतून सुरू आहे.
पुणे शहर व ग्रामीण हद्दीतील पोलिस ठाणे मिळून नव्याने पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. १५ ऑगस्ट २०१८ पासून चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथून आयुक्तालयाचे स्वतंत्र कामकाज सुरू झाले. त्यानंतर चिंचवडमधील प्रेमलोक पार्कमधील महापालिकेची महात्मा फुले शाळेची इमारत पोलिस आयुक्तालयासाठी देण्यात आली. आणि एक जानेवारी २०१९ पासून प्रेमलोक पार्क येथील इमारतीतून कामकाज सुरू झाले. ते अद्याप येथूनच सुरू आहे. मात्र, ही इमारत अपुरी पडत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयासह इतर कामकाजासाठीही पुरेशी कार्यालये उपलब्ध नाहीत. पोलिस आयुक्तालयासाठी शासनाकडे चिखलीतील गट क्रमांक ५३९ येथील ३.३९ हेक्टर जागेची मागणी करण्यात आली होती. ही जागा मिळण्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्ष जागा कधी मिळणार व हक्काची इमारत कधी उभी राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुख्यालयासाठी मिळेना जागा
पोलिस मुख्यालयासाठी प्रशस्त जागेची गरज आहे. यासाठी देहूतील विठ्ठलनगर येथील वीस हेक्टर जागेची मागणी करण्यात आली होती. मात्र, स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे या जागेचा मुद्दा मागे पडला. इतर जागेचा शोध सुरू केला. ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या वळूमाता प्रजनन क्षेत्र केंद्राच्या वीस हेक्टर जागेची मागणी करण्यात आली. मात्र, ही जागा अद्यापही उपलब्ध झालेली नाही. सध्या निगडीतील कै. अंकुश बोऱ्हाडे शाळेची इमारत व मोकळ्या जागेत मुख्यालयाचे कामकाज सुरू आहे. ही जागा अपुरी पडत आहे.
वाकडमध्ये १५ एकर जागा
परिमंडळ दोनचे कार्यालय, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निवासस्थान, सांस्कृतिक भवन आदींसाठी वाकडमधील कस्पटे वस्ती- काळेवाडी रस्त्यावरील पीएमआरडीएची पंधरा एकर जागा लवकरच पिंपरी-चिंचवड पोलिस दलाला उपलब्ध होणार आहे. याबाबतची सत्तर टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
प्रशस्त जागेअभावी अडचणी
- परेडसाठी पुरेशी जागा नाही
- भरती प्रक्रियेसाठी बाहेरील मैदानांचा वापर
- बंदोबस्तासाठी बाहेरील आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्था नाही
- शस्त्रागारसाठी स्वतंत्र जागा नाही
- विविध प्रशिक्षण, अंतर्गत कार्यक्रमांसाठी पुरेशी जागा नाही
भाडेतत्त्वारील इमारती
पोलिस आयुक्तालय (प्रेमलोक पार्क, चिंचवड), पोलिस मुख्यालय (निगडी), वाहतूक शाखा कार्यालय (चापेकर चौक, चिंचवड), पोलिस उपायुक्त, परिमंडळ कार्यालय, चिंचवड आणि पिंपरी वाहतूक विभाग आदी ठिकाणच्या इमारती महापालिकेने पोलिस आयुक्तालयाला भाडेतत्त्वावर दिल्या आहेत.
सध्याचे मनुष्यबळ
अधिकारी / संख्या
पोलिस आयुक्त / १
पोलिस सहआयुक्त / १
अपर पोलिस आयुक्त / १
पोलिस उपायुक्त / ६
सहायक पोलिस आयुक्त / ११
पोलिस निरीक्षक / ६२
सहायक निरीक्षक / ७१
उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक / ४०१
अंमलदार / ३,६३८
पोलिस आयुक्तालयासाठी मोशी येथील जागा मिळाली आहे. लवकरच त्याची उर्वरित प्रक्रिया पूर्ण होईल. तसेच निवासस्थान व इतर उपक्रमासाठी वाकड येथे १५ एकर जागा मिळाली आहे. या दोन्ही ठिकाणच्या जागा प्राप्त झाल्यानंतर लगेचच इमारत उभारणीला सुरुवात होईल. मुख्यालयासाठी ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या जागेची मागणी केलेली आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे.
- विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड