पुणे (Pune) : हेल्मेटविना दुचाकी चालविल्याप्रकरणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पुण्यातील सुमारे १० हजार वाहनचालकांवर कारवाई केली. यातून ४४ लाख ५७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. (Mandatory Helmet Use In Pune)
ही कारवाई ‘आरटीओ’च्या वायुवेग पथकाने १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान केली. गेल्या काही दिवसांपासून सरकारी कार्यालयांत दुचाकीवर येणाऱ्यांना हेल्मेट अनिवार्य केले आहे. त्याआधी शासकीय कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती करण्यात आली. त्यामुळे हेल्मेटच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे.
पुणे ‘आरटीओ’च्या वायुवेग पथकाने ऑक्टोबरमध्ये ४ हजार १६५ वाहनांची तपासणी केली. पैकी २ हजार १७५ दुचाकीचालकांनी हेल्मेट घातले नसल्याने त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातून सुमारे १० लाख २९ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. हेल्मेट नसेल तर ५०० रुपयांचा दंड आहे.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आदेश दिल्यानंतर ‘आरटीओ’ प्रशासनाने हेल्मेट न घालता दुचाकीने सरकारी कार्यालयांत येणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत.
पहिल्या टप्प्यात विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद या कार्यालयाचा समावेश करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली.
दुसऱ्या टप्प्यात उर्वरित सर्वच शासकीय कार्यालयांत हेल्मेट सक्तीची मोहीम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.