PM Awas Tendernama
पुणे

Pune : पुण्यात PM Awas साठी साडे चार हजार अर्ज; पालिका बांधणार 4 हजार घरे

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पंतप्रधान आवास (PM Awas) योजनेसाठी शहराच्या वेगवेगळ्या भागांतील प्रकल्पांसाठी आत्तापर्यंत साडेचार हजार अर्ज महापालिका प्रशासनाकडे आले आहेत. महापालिका प्रशासनाकडून शहरातील पाच ते सहा भागांमध्ये ४ हजार १७३ घरे बांधण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारकडून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना कमी खर्चात हक्काचे घर मिळावे, यासाठी संबंधित योजना सुरू करण्यात आली आहे. पुणे महापालिकेने या योजनेची अंमलबजावणी करून पहिल्या टप्प्यात वडगाव बुद्रुक, खराडी, हडपसर या भागात २ हजार ९१८ घरे बांधून त्यांचे वितरण केले.

दरम्यान, सप्टेंबर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान आवास योजना २’ची घोषणा केली. योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचीदेखील महापालिकेने अंमलबजावणी केली. त्यानुसार, दुसऱ्या टप्प्यात महापालिका प्रशासनाने धानोरी, हडपसर, कोंढवा, बालेवाडी, वडगाव खुर्द या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ४ हजार १७३ घरे उभारण्याचे जाहीर केले.

त्यानुसार, आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्जही मागविण्यात आले. त्यानुसार आत्तापर्यंत ४ हजार ६६६ इतके अर्ज महापालिकेकडे दाखल झाले आहे. या घरांसाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च महापालिका प्रशासनाला येणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.