Pune District
Pune District Tendernama
पुणे

Pune : अखेर 'त्या' धोकादायक पुलाच्या कामाला मिळाला मुहूर्त

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मागील सुमारे दोन वर्षांपासून अत्यंत धोकादायक स्थितीत असलेल्या पुणे-पानशेत रस्त्यावरील (Pune Panshet Road) सोनापूर गावच्या हद्दीतील पुलाचे (Bridge) काम अखेर सुरू झाले आहे. सदर पूल धोकादायक स्थितीत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.

पुणे-पानशेत रस्त्यावरील सोनापूर गावच्या हद्दीत असलेला पूल मागील दोन वर्षांपासून खचत चालला होता. मागील वर्षीच्या पावसाळ्यात पुलाचा सुमारे पन्नास ते साठ मीटर लांबीचा भाग एक ते दीड फूट खाली खचला होता. तेव्हापासून या पुलावरून केवळ एकेरी वाहतूक सुरू आहे. खचलेला पुलाचा भाग खडकवासला धरणाच्या पाण्याला लागून असल्याने अपघात झाल्यास मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच पूल कोसळल्यास पानशेत परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला असता.

स्थानिक रहिवासी, नोकरदार व पानशेत, वरसगाव परिसरात येणारे पर्यटक यांच्या जिवाला निर्माण झालेला संभाव्य धोका टाळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवीन पुलाच्या कामाला मंजुरी घेतली व त्यानुसार कामाला सुरुवात केली आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पत्र लिहून पुलाचे काम करून घेण्याची मागणी केली होती. अखेर काम सुरू झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

या पुलाच्या कामासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. झाडांच्या फांद्या तोडून इतर साफसफाई करण्यास सुरवात केली आहे. वाहतूक सुरळीत ठेवून टप्प्याटप्प्याने काम करण्यात येणार आहे. मातीचे परीक्षण करून आराखडा तयार करण्यात आला असून गुणवत्तापूर्ण काम करून घेण्यात येणार आहे.

- अमोल पवार, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग, पुणे