pune Tendernama
पुणे

Pune : 6 वर्षांनंतरही 'त्या' पुलाचे काम अपूर्णच; कोंडी कधी फुटणार?

टेंडरनामा ब्युरो

मुंढवा (Mundhwa) : केशवनगरमधील गोदरेज प्रॉपटीर्ज ते खराडी स.नं. ६८ व ६९ येथील नवीन नदी पुलाचे काम ८० टक्के काम पूर्ण झाले असून, खराडीच्या दिशेने असलेल्या पुलाचे २० टक्के काम गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. महापालिकेने या उर्वरित कामास लवकर सुरुवात करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

केशवनगरमधील हा नवीन नदी पूल २४ मीटर रुंद ते २०० मीटर लांबीचा आहे. त्यासाठी पालिकेने एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, मात्र काही कारणांमुळे पुलाचे उर्वरित काम काही महिन्यांपासून रखडल्याने या परिसरातील नागरिकांना तीन किलोमीटर लांबच्या रस्त्याने कोंडीतून मार्गक्रमण करावे लागत आहे. प्रलंबीत काम लवकर सुरू स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

केशवनगरमध्ये मोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. तेथे ४० हजारापेक्षा जास्त नागरिक राहतात. त्यातील खराडी आयटी पार्कमध्ये सुमारे तीन हजार तरुण काम करतात. त्यांना मुंढवा पुलावरून जाताना पाच किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. हा पूल झाल्यास या तरुणांना अवघ्या १० मिनिटांत कामावर पोहता येईल, त्यामुळे त्यांनाही हे काम पूर्ण होण्याची प्रतिक्षा आहे.

याबाबत मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे व उपअभियंता प्रवीण येळे यांच्याशी वारंवार संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

केशवनगर-खराडी पुलाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे, मात्र भूसंपादनाच्या अडचणींमुळे हे काम लांबले आहे. महापालिकेने ही समस्या सोडवून कामास लवकर सुरुवात करावी.

- सुनील जगताप, स्थानिक नागरिक

गेल्या ५-६ वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे. या पुलामुळे खराडी-केशवनगर कनेक्टिव्हिटीचा प्रश्‍न सुटेल, असा दावा करत येतील बांधकाम व्यावसायिकांनी या पुलाजवळील फ्लॅट जास्त किमतीत विकले. मात्र अद्याप हे काम अपूर्ण असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

- चैतन्य शर्मा, स्थानिक नागरिक