PMC Pune Tendernama
पुणे

Pune : 326 कोटींची थकबाकी पण महापालिकेला कारवाईचा विसर पडलाय का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेने (PMC) मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी सिंहगड इन्स्टिट्यूटची जप्तीची नोटीस काढली. २३ इमारती जप्त केल्या जाणार असल्याचे सांगितले. पण प्रत्यक्षात तसे काहीच केलेले नाही.

याउलट शहरातील व्यापारी, व्यावसायिकांची थकबाकी या संस्थेपेक्षा कमी असतानाही त्यांची दुकाने, कार्यालये सील करून दुजाभाव करणारी कारवाई करण्यात येत आहे, असा आरोप मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी पत्रकार परिषदेत केला.

मिळकतकर विभाग प्रमुख उपायुक्त माधव जगताप हे मनमानी पद्धतीने काम करत आहेत. याविरोधात आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना भेटून जगताप यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली असल्याचे संभूस यांनी सांगितले.

याबाबत उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘‘सिंहगड संस्थेची थकबाकी ३२६ कोटी रुपये आहे. पण न्यायालयाने अनेक इमारतींवर कारवाई करू नये, असे आदेश दिले आहेत. त्यांची आता केवळ ४८ कोटीचीच थकबाकी वसूल करता येते. तसेच जप्त मिळकतींचा लिलाव करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. संभूस यांनी केलेल्या आरोपांविरोधात वकिलांमार्फत त्यांना नोटीस बजावली जाईल.’’