PMP Bus Pune
PMP Bus Pune Tendernama
पुणे

Pune: पीएमपीच्या प्रवाशांना कोणी 'छप्पर देते का छप्पर?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मागील चार वर्षांपासून पीएमपीची बसथांब्यासाठी (PMP Bus Stop) सुरू असलेली भटकंती संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सात वेळा टेंडर (Tender) प्रसिद्ध करूनही शून्य प्रतिसाद मिळाल्याने ‘पीएमपी’ने अखेर बसथांब्यांच्या नियमावलीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमात जाहिरातदार, ठेकेदारांच्या सूचनांचा विचार केल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याची आशा आहे. असे असले तरी बसथांबे बांधून पूर्ण होण्यास सप्टेंबर उजाडणार आहे. त्यामुळे प्रवाशांना उन्हाळा व पावसाळा छप्परविनाच काढावे लागणार हे निश्चित.

पीएमपी प्रशासनाने चार वर्षांत आतापर्यत सहावेळा बसथांब्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले. मात्र, त्याला जाहिरातदारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. २०२०-२१ या वर्षात एक हजार ५०० बसथांब्यांसाठी टेंडर प्रसिद्ध झाली. त्यांनतर पुन्हा एक हजार ५०० व दोन वेळा ६०० बसथांब्यांची टेंडर काढले. परंतु, कोणीही जाहिरातदाराने बसथांबा बांधण्यास सहमती दर्शवली नाही. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत ३०० बसथांब्यांसाठी टेंडर प्रक्रिया राबवली. त्यालाही शून्य प्रतिसाद लाभला.

मुदतवाढ देऊनही कोणताच प्रतिसाद लाभत नाही. परिणामी पीएमपी प्रशासनाने आपल्या नियमामध्ये बदल करण्याचे ठरविले आहे. मात्र, हे पीएमपीला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. हाच निर्णय आधी घेतला असता, तर प्रवाशांना आता छत नसलेल्या थांब्यावर उभे राहण्याची वेळ आली नसती.

काय बदल केला?
- बीओटी तत्त्वावर स्टेनलेस स्टीलचा बसथांबा बांधणार
- एक बसथांबा बांधण्यासाठी सुमारे चार लाखांचा खर्च
- बसथांब्यांची मालकी १५ वर्षांनंतर पीएमपीकडे जाणार
- पीएमपीला बसथांब्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात आता वार्षिक दरवाढ दहाऐवजी सहा टक्के केली

प्रवासी मात्र ऊन-पावसात!
‘पीएमपी’ ३०० बसथांबे बीओटी तत्त्वावर उभारणार आहे. यासाठीची टेंडर प्रक्रिया सुरू झाल्यावर संबंधित संस्था त्यात भाग घेणार. टेंडर प्रक्रियेची मुदत संपल्यावर २१ दिवस त्याची प्रक्रिया चालेल. ज्या संस्थेला याचा मक्ता मिळेल. त्याने कराराच्या तारखेपासून ४५ दिवसांत बसथांब्याचे आरेखन, महापालिका किंवा अन्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आदी कामे करणे. ४५ दिवस ते ९० दिवसांत पहिले १०० बसथांबे बांधणे अपेक्षित आहे.

९० दिवसांपासून ते पुढील ४५ दिवसांपर्यंत म्हणजे एकूण १३५ दिवसांत आणखी १०० बसथांबे उभारणे, तर शेवटच्या टप्प्यात १३५ ते १८० दिवसांत उर्वरित १०० बसथांबे बांधणे अपेक्षित आहे. मे महिन्यात निविदेचे काम पूर्ण होईल. प्रत्यक्षात काम जरी सुरू झाले, तरी पहिले १०० बसथांबे बांधून पूर्ण होण्यास सप्टेंबर महिना उजाडेल. त्यामुळे प्रवाशांना उन्हाळा व पावसाळा छप्परविनाच काढावे लागणार हे निश्चित.

गरज ९०००, प्रत्यक्षात १३२० थांबे
पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए असे तिन्ही क्षेत्र मिळून तसेच येणारे व जाणाऱ्या असे दोन्ही मार्गांचा विचार करून पीएमपीकडे सुमारे नऊ हजार बसथांब्यांची नोंद आहे. यापैकी केवळ एक हजार ३२० ठिकाणीच छत असलेले थांबे आहेत. त्यात ‘बीआरटी’च्या १२० थांब्यांचा समावेश आहे. थांब्यासारखी प्राथमिक सुविधा देण्यातच ‘पीएमपी’ला अपयश येत आहे. निधीची कमतरता सांगत त्यांनी जाहिरातदाराकडे बोट केले आहे.

शेडअभावी गैरसोयी...
- प्रवाशांना तळपत्या उन्हातच उभे राहावे लागते
- पावसाळ्यातही प्रचंड गैरसोय होते
- ज्येष्ठ, महिला, लहान मुलांना बसायला जागा नसते
- महिलांना लहान मुलांना कडेवर घेऊनच बसची वाट पाहावी लागते

पीएमपी दृष्टिक्षेपात :
एकूण बससंख्या : १८००
प्रवासी संख्या : सुमारे १२ लाख
एकूण बसथांबे : ९०००
शेड असलेले थांबे : १२००
बीआरटी मार्गावर थांबे : १२०
छत असलेल्या थांब्याचा खर्च : सुमारे ४ लाख

बसथांब्यांच्या टेंडरला प्रतिसाद मिळत नसल्याने नियमात आवश्यक तो बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने टेंडर प्रक्रिया राबवली जाईल. त्याला चांगला प्रतिसाद लाभेल अशी आशा आहे.

- ओममप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

विशेषतः बसची वारंवारता कमी आहे. त्यात थांब्यांवर तासन् तास बसची वाट पाहावी लागते. थांब्यांना छप्पर असणे आवश्यक असून चांगले थांबे प्रवाशांसाठी उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून आता कडक उन्हात बसची वाट पाहणे थांबेल.
- मीरा वाघमारे, प्रवासी, हडपसर