Rajesh Deshmukh
Rajesh Deshmukh Tendernama
पुणे

Pune : वढूतील 269.24 कोटींच्या विकास आराखड्यातील कामांचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे जिल्ह्यातील प्राचीन वास्तू, गड-किल्ले संवर्धनास, ऐतिहासिक तसेच धार्मिक स्थळांच्या परिसरातील पर्यटनास चालना मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यादृष्टीने जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून नियोजनही करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे हवेली तालुक्यातील बलिदान स्थळ मौजे तुळापुर आणि शिरूर तालुक्यातील समाधी स्थळ स्मारक वढू (बु.) येथील २६९ कोटी २४ लाख रुपयांच्या विकास आराखड्यातील कामांची टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. छत्रपती श्री संभाजी महाराज पुण्यतिथीच्या दिवशी टेंडर प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आली असून, दोन्ही कामे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीपूर्वी (१४ मे) सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

श्री क्षेत्र जेजुरी विकास आराखड्यांतर्गत १०९ कोटी ५७ लाखांच्या विकास आराखड्यातील कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील मौजे सदुंबरे येथील श्री संत जगनाडे महाराज विकास आराखड्यासही मंजुरी देऊन शासन मान्यतेसाठी विभागीय आयुक्तालयास ६२ कोटी ९३ लाख रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला आहे. दरम्यान, अष्टविनायक विकासाचा ४३ कोटी २३ लाख रुपयांचा आराखडा मुख्य सचिवांच्या मंजुरीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू स्मारक विकास आराखडा सुधारित करून शासनास सादर करण्याचे काम करण्यात येत आहे. हे राष्ट्रीय स्तरावरील प्रेरणा केंद्र व्हावे, यासाठी किमान २०० कोटींचा आराखडा तयार करण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांनी दिली.

प्राचीन शैलीशी साधर्म्य असणारी कामे

जिल्हाधिकारी राजेश देशमुख म्हणाले, ‘‘ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची कामे पुरातत्व विभागामार्फत करताना मूळ वास्तू आणि प्राचीन शैली यांच्याशी साधर्म्य असणारी कामे दिसतील, याकडे लक्ष दिले जाईल. गड आणि किल्ले ही राष्ट्रीय अभिमानाचे प्रतिके असल्याने हा इतिहास जतन करून ठेवण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच या कामांमुळे जिल्ह्यातील पर्यटनालाही चालना मिळेल.’’