पुणे (Pune) : पुणे शहरातील महत्त्वाच्या ९८ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकेने पूर्ण केले आहे. त्यापैकी ६० पुलांचे आयुर्मान दहा वर्षांपेक्षा कमी असल्याने त्यांना दुरुस्तीची गरज नाही. मात्र, ३८ पूल दहा वर्षांपेक्षा अधिक जुने असल्याने त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.
आतापर्यंत आठ पुलांचे काम पूर्ण झाले. उर्वरित ३० पुलांचे काम टप्प्याटप्प्याने केले जाईल. त्यामुळे कामाला गती द्या, असा आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला. (Pune City Bridges News)
सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
कुंडमळा येथील घटनेमुळे पुन्हा एकदा पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातून मुळा-मुठा नदी ४४ किलोमीटर अंतरापर्यंत वाहते, त्यामुळे अनेक ठिकाणी पूल बांधलेले आहेत. त्यात होळकर पूल, छत्रपती शिवाजी महाराज पूल ब्रिटिशकालीन आहेत. अनेक ठिकाणी लोहमार्गावरील पूल आहेत. चौकाचौकांत उड्डाणपूलही बांधलेले आहेत.
शहरातील नाल्यांवर सुमारे ४५० कल्व्हर्ट आहेत. सप्टेंबर २०१९ मध्ये पुण्यात ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे आंबिल ओढ्याला पूर आला. त्यामुळे अनेक पूल धोकादायक झाले. त्यानंतर महापालिकेने सुमारे ३२ कल्व्हर्ट बांधण्याचे काम हाती घेतले होते.
एकूण ९८ पूल
महापालिकेने गेल्या दोन-तीन वर्षांपासून शहरातील पुलांचे सर्वेक्षण करून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. शहरात नदीवर ३२, रेल्वे मार्गावर नऊ, उड्डाणपूल २०, पादचारी भुयारी मार्ग १८, वाहन भुयारी मार्ग नऊ, पादचारी पूल दहा, असे एकूण ९८ पूल व भुयारी मार्ग आहेत. त्यापैकी ३८ पूल दहा वर्षांपेक्षा अधिक जुने आहेत; तर उर्वरित ६० पूल दहा वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.
आठ पुलांची दुरुस्ती पूर्ण
३८ पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार बोपोडीतील वि. भा. पाटील पूल, पौड फाट्यावरील वीर सावरकर उड्डाणपूल, औंधमधील राजीव गांधी पूल, नवी पेठेतील एस. एम. जोशी पूल, ओंकारेश्वर मंदिर येथील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल, कात्रज-कोंढवा उड्डाणपूल, नवी संगमवाडी पूल व आगाखान पूल यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ठिकाणचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पूल वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागत असल्याने कामे करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत.