PMP Bus Pune Tendernama
पुणे

Pune : ठेकेदाराकडून कराराचे उल्लंघन; पुणेकरांना असा बसला मोठा फटका

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : ‘पीएमपी’च्या चालकांइतके वेतन मिळावे, यासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी ‘ट्रॅव्हलटाइम’च्या ठेकेदाराच्या (Contractor) सुमारे ४०० हून अधिक चालकांनी शुक्रवारी संप केला. त्यामुळे सुमारे दोनशे गाड्यांना ‘ब्रेक’ लागला. इलेक्ट्रिकसह सीएनजी गाड्यांची सेवा बंद होती. त्याचा फटका सुमारे १ लाख प्रवाशांना बसल्याची शक्यता आहे.

वाघोली, कोथरूड व पुणे रेल्वेस्थानक डेपोच्या बस वाहतुकीवर परिणाम झाला. पीएमपी प्रशासनाने अन्य डेपोतून बसची जुळवाजुळव केली, मात्र त्याचा परिणाम अन्य मार्गांवरच्या बस वाहतुकीवर झाला.

‘पीएमपी’च्या स्वतःच्या व सात ठेकेदारांच्या बसच्या माध्यमातून सेवा दिली जाते. सात ठेकेदारांपैकी एक असलेल्या ‘ट्रॅव्हलटाइम’च्या चालकांनी शुक्रवारी संप केला. सकाळ व दुपारच्या सत्रात हा संप झाला. ‘ट्रॅव्हलटाइम’च्या एकूण २३८ बस प्रवासी सेवा देतात. २०० पेक्षा जास्त चालक संपात सहभागी झाल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसला. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपी प्रशासनाने जास्तीच्या गाड्या मार्गावर सोडण्याचे नियोजन केले.

कराराचे उल्लंघन, ठेकेदाराला नोटीस

‘पीएमपी’ प्रशासन व ठेकेदार यांच्यात प्रवासी सेवेबाबत जे करार झाले आहेत, त्यानुसार गाड्या बंद होणार नाहीत, याची जबाबदारी ठेकेदारावर सोपवली आहे. शुक्रवारी या कराराचे उल्लंघन झाले. पीएमपी प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला नोटीस दिली आहे. पगाराचा मुद्दा हा ठेकेदारांचा अंतर्गत असला तरीही त्याचा फटका सामान्य प्रवाशांना बसला आहे.

प्रवासी सेवा बाधित होऊ नये, यासाठी आम्ही अतिरिक्त बस मार्गावर सोडल्या. तसेच संबंधित ठेकेदारालादेखील नोटीस देण्यात आली आहे. प्रवासी सेवा पूर्ववत करणे हे आमचे प्राधान्य आहे.

- सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी