Sinhgad Road Traffic
Sinhgad Road Traffic Tendernama
पुणे

Pune: सिंहगड रोडवर 'या' वाहनांना बंदी घालाच? कोणी केली मागणी...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : सिंहगड रस्त्यावरील (Sinhgad Road) वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त असताना त्यातच गर्दीच्या वेळी जड वाहतुकीची भर पडते आहे. किमान गर्दीच्या वेळी तरी जड वाहतूक थांबवण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

सिंहगड रस्ता परिसरात सकाळी साडेआठ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते साडेनऊ या वेळात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. हिंगणे, विश्रांतीनगर, विठ्ठलवाडी, राजाराम पूल चौक, मातोश्री वृद्धाश्रम, कर्वेनगर, डीपी रस्ता या परिसरात सकाळी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.

विश्रांती नगर ते मातोश्री वृद्धाश्रम, राजाराम पूल मार्गे मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. परंतु, या भागात जड वाहतूक सकाळी गर्दीच्या वेळी बंद करण्यात यावी तसेच येथे असलेला बस थांबा राजाराम पूल ओलांडून शारदा मठ जवळ नेण्यात यावा. यासोबतच रिक्षा थांबा देखील पुढे नेण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बस प्रवासी घेण्यासाठी डावीकडे वळते. त्यानंतर बस पुन्हा उजवीकडे वळते या सगळ्या प्रकारात वाहतूक कोंडीत भर पडत जाते. सोबतच प्रवासी घेण्यासाठी या ठिकाणी थांबलेल्या रिक्षांची देखील अडचण होते. राजाराम पुलाच्या आधी म्हणजे विठ्ठलवाडी कमानी जवळ देखील बसथांबा आहे. त्यामुळे दोन बस थांब्यांमधील अंतर जेमतेम १५० ते २०० मीटर आहे.

सकाळी गर्दीच्या वेळी येथील जड वाहतूक,बस वाहतूक आणि रिक्षा थांबा यामुळे अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीत भर पडते. यावर तत्काळ उपाययोजना होणे गरजेचे आहे.

- राणी शिंदे, स्थानिक रहिवासी

या ठिकाणचा रिक्षाथांबा हलविण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी गर्दीच्या वेळात जड वाहतूक देखील बंद करण्यात येईल.

- पांडुरंग वाघमारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग