पुणे (Pune) : बालभारती ते पौड फाटा रस्त्याच्या (Balbharti To Paud Phata Road) अलाइनमेंटमध्ये (संरेखन) झालेला बदल हा विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नव्हे तर बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांच्या विकासासाठी करण्यात आला आहे, असा आरोप वेताळ टेकडी बचाव कृती समितीने शनिवारी केला आहे.
बालभारती-पौड फाटा रस्ता प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या वाहतूक कोंडी सर्वेक्षणाच्या माहितीमध्येही अनेक त्रुटी असून डिसेंबर २०२२ मध्ये माहिती अधिकाराअंतर्गत (RTI) याबाबतची माहिती मिळविण्यात आली होती.
दरम्यान, फेब्रुवारी २०१९ मध्ये टाउन प्लॅनिंगच्या (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) उपसंचालकांनी मंजूर केलेल्या या प्रकल्पात अनेक व्यावसायिक इमारती, शॉपिंग सेंटर्स आणि ४१ मजली निवासी इमारतींचा समावेश आहे. तेव्हाच्या आणि सध्याच्या दाखविण्यात येणाऱ्या अलाइनमेंटमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे प्रस्तावित रस्त्याच्या खर्चातही वाढ होत आहे.
पुणे महापालिकेचा दावा आहे की, हा बदल बालभारती रस्ता प्रस्तावित ‘एचसीएमटीआर’मध्ये विलीन करण्यासाठी आहे, परंतु प्रकल्पाच्या अहवालातील नकाशात स्पष्टपणे दिसून येत आहे की हा बदल बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांना ३० मीटर रुंद रस्ता उपलब्ध व्हावा आणि त्यांना वाढीव एफएसआय मिळावा यासाठी आहे.
त्यामुळे बालभारती ते पौड फाटा रस्ता नक्की नागरिकांच्या हितासाठी आहे की बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी असा प्रश्न वेताळ टेकडी बचाव कृती समितीने उपस्थित केला आहे.
आधी बालभारती ते पौड फाटा रस्ता आणि ‘एचसीएमटीआर’ हे दोन स्वतंत्र रस्ते होते. पण, आता हे दोन्ही मिळून एकच रस्ता केला जाणार आहे. हा पूर्णपणे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीचाच प्रकल्प असून आम्ही कोणाचा वैयक्तिक विचार न करता नागरिकांसाठी या रस्त्याचे नियोजन करत आहोत.
- निखील मिजार, वाहतूक नियोजनकार, महापालिका