Pune City
Pune City Tendernama
पुणे

Pune : लोहगावकडे जाणाऱ्या पर्यायी रस्त्यास परवानगी मिळेना; 'हे' आहे कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : लोहगावला ये-जा करणाऱ्या पर्यायी रस्त्याला परवानगी मिळण्यासाठी संरक्षण विभागाकडे महापालिका सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र, अद्यापही परवानगी मिळाली नाही. त्यामुळे या कामाला विलंब होत आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या प्रयत्नांतून लोहगाव येथील विमानतळाची धावपट्टी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लोहगाव विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, धावपट्टी वाढविताना वैकफिल्ड चौकातून लोहगावला जोडणारा रस्ता नागरिकांसाठी बंद होणार आहे. त्यास पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासन व हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात पाहणी करून दोन पर्याय सुचविले होते. त्यामध्ये दीड किलोमीटरचा बर्माशेल झोपडपट्टीजवळून संरक्षण विभागाच्या भिंतीलगत, खाणीपासून कलवड रस्त्याने लोहगाव रस्त्याला जोडणारा रस्ता आणि एक किलोमीटरचा केंद्रीय विद्यालयाजवळून संरक्षण विभागाच्या भिंतीलगत खाणीपासून पुढे कलवडवस्ती, लोहगावला जाणाऱ्या रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचा पर्याय दिला होता.

या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळावी, यासाठी महापालिका प्रशासनाने संरक्षण मंत्रालयास माहिती पाठविली. त्यानंतर संरक्षण विभागाने महापालिकेला दोनवेळा तांत्रिक बदल करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार आवश्‍यक बदल करून संरक्षण विभागाला माहिती पाठविली. मात्र त्यास मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे रस्त्याच्या कामाला विलंब होत आहे.

लोहगावच्या पर्यायी रस्त्यासाठी महापालिकेने संरक्षण विभागाला माहिती पाठविली. त्यांच्या सूचनेनुसार दोनवेळा बदल करून त्रुटींचे निराकरण केले. परंतु संरक्षण विभागाकडून परवानगी मिळाली नाही. परवानगी मिळाल्यास रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करता येईल.
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका