Pune Airport
Pune Airport Tendernama
पुणे

Pune Airport : पुणे विमानतळावरून प्रवास करताय, मग ही बातमी वाचाच!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : यंदाच्या दिवाळीत पुणे विमानतळावरून (Pune Airport) प्रवास करणे प्रवाशांसाठी खर्चिक ठरणारे आहे. विमान कंपन्यांनी तिकीट दरात जवळपास तिप्पट वाढ केली आहे. त्यामुळे चार ते पाच हजार रुपयांच्या घरातील तिकिटाचे दर २० ते २५ हजारांच्या घरात गेले आहेत.

सर्वाधिक दर दिल्लीसाठी आहेत. दिवाळीच्या ट्रॅव्हल्स कंपन्या मनमानी दरवाढ करतात. त्याचप्रमाणे विमान कंपन्याही मनमानी पद्धतीने दर वाढवितात. याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागतो.

असे आहेत विमान तिकिटांचे दर

(कुठून-कुठे : सामान्य दर : दिवाळीतील दर)

- पुणे ते दिल्ली ः ५ ते ६ हजार ः २४ ते २५ हजार

- पुणे ते कोलकता ः ५ ते ६ हजार ः १८ हजार

- पुणे ते हैदराबाद ः ४ ते ५ हजार ः १५ हजार

- पुणे ते बंगळूर ः ४ ते ५ हजार ः १८ हजार

- पुणे ते मुंबई ः ४ ते ४ हजार ५०० ः ६ हजार

- पुणे ते चेन्नई ः ४ ते ५ हजार ः १३ हजार

सणातच का वाढतात दर ?

‘विंटर शेड्यूल’नंतर दिवाळी, नाताळ सारखे सण मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. या काळात शाळांना सुट्ट्याही असतात. त्यामुळे अनेक जण पर्यटनाचे नियोजन करतात. विमान कंपन्यांसाठी हाच हंगाम असतो. वर्षातील उरलेला कालावधी विमान कंपन्यांसाठी लीन सीझन’ (कमी प्रतिसाद) असतो. त्यामुळे वर्षभराचे उत्पन्न याच काळात मिळविण्यासाठी दरात बरीच वाढ केली जाते.

दिवसा उड्डाणे वाढण्याची गरज

पुणे विमानतळावरून दिवसाला सरासरी ९० विमानांची उड्डाणे होतात. यात रात्री आणि मध्य रात्रीच्या उड्डाणांची संख्या जास्त आहे. रात्री ८ ते सकाळी ८ दरम्यान जास्त विमानांची वाहतूक होते. ही संख्या सुमारे ५५ इतकी आहे. सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान तीन तासांचा कालावधी ‘नोटम’चा असतो. यात मार्गावरील संभाव्य स्थितीमुळे तांत्रिक कारणांसाठी उड्डाणांना मनाई असते. पुणे विमानतळावर हा कालावधी सकाळी ८ ते ११ असा आहे.

दिवसभरातील उड्डाणांची संख्या ३५ इतकी आहे. ती कमी असल्यामुळे दिवसाच्या विमानांचे तिकीट दर जास्त असतात. तर तुलनेने रात्रीच्या विशेष करून ‘रेड आय फ्लाइट’ च्या विमानांच्या तिकिटाचे दर कमी असतात. अशी विमानांचे मध्यरात्री उशिरा उड्डाण होते आणि ती नियोजित ठिकाणी पहाटे किंवा सकाळी पोहोचतात. ज्या विमानांच्या प्रवासाच्या कालावधीत प्रवाशांची रात्रीची झोप व्यत्यय न येता पूर्ण होऊ शकत नाही त्या विमानांना ‘रेड आय फ्लाइट’ असे संबोधले जाते.

विमानाच्या तिकीट दरावर सरकारचे नियंत्रण नसते. हे दर वाढण्यापूर्वीच तिकीट काढणे प्रवाशांसाठी फायद्याचे ठरेल. त्यासाठी प्रवाशांनी दोन ते तीन महिने आधी प्रवासाचे नियोजन करायला हवे. तसे केल्यास त्यांना कमी दरात तिकीट मिळू शकतील.

- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ