Metro (File) Tendernama
पुणे

Pune : मेट्रोचा वापर करायचा असेल तर चालण्याची सवय लावून घ्या! कोणी दिला पुणेकरांना सल्ला?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मेट्रो स्थानक (Metro Station) परिसरात वाहनतळांची (Parking) पुरेशी व्यवस्था करणे कठीण आहे. शिवाय, नागरिकांनी मेट्रो स्थानकापर्यंत पायी किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसने येणे अपेक्षित आहे. त्यासाठी पीएमपीची (PMP) फिडर सेवा व शेअर रिक्षा सुविधा उपलब्ध आहे. मात्र, ‍सद्यःस्थितीत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो स्थानके व अंतर्गत भागाच्या कनेक्टिव्हिटीसाठी आणि सक्षम फिडर सेवा देण्यासाठी ‘पीएमपी’च्या ताफ्यात किमान एक हजार बसची आवश्यकता आहे, असे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत हर्डीकर म्हणाले, ‘‘मुंबई, दिल्लीतील लोक पायी किंवा सार्वजनिक वाहतूक सेवेतील बसने मेट्रो स्थानकापर्यंत येतात. त्यामुळे तेथील मेट्रोला प्रतिसाद मिळतो. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत चालत येण्याची किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याची सवय लावावी लागणार आहे. त्यासाठी पादचारी मार्ग विकसित केले जात आहेत. स्थानकापर्यंत येण्यासाठी पीएमपी, शेअर रिक्षाची सुविधा केली जात आहे.’’

पिंपरी-चिंचवडमधील कंपन्यांतील अनेक कामगार पुण्यात राहतात. ते खासगी बसने प्रवास करतात. अशा कामगारांनी मेट्रोने प्रवास करावा, यासाठी कंपनी व्यवस्थापनांशी चर्चा सुरू आहे. निगडीपर्यंत मेट्रो मार्गाच्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. तीन महिन्यांत प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. साडेतीन वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले.

बारा स्थानकांवर पार्किंग व्यवस्था

पिंपरी-चिंचवड, संत तुकारामनगर, फुगेवाडी, शिवाजीनगर, शिवाजीनगर न्यायालय, स्वारगेट, आयडियल कॉलनी, गरवारे कॉलेज, वनाज डेपो, रेंजहिल्स डेपो, नळस्टॉप या मेट्रो स्थानकांवर पार्किंगची व्यवस्था कशी करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे, असे हर्डीकर यांनी स्पष्ट केले.

पूर्ण मार्गांवर मार्चमध्ये वाहतूक

वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या संपूर्ण मार्गाचे काम या वर्षी पूर्ण होईल. त्यानंतर रूबी हॉल- रामवाडी आणि शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या मार्गांची सुरक्षाविषयक तपासणी होईल. त्यानंतर मार्चमध्ये दोन्ही मार्गांवरील संपूर्ण वाहतूक सुरू होऊ शकते, अशी माहिती हर्डीकर यांनी दिली.

‘पीएमपी’, रिक्षाची मदत घेणार

प्रवाशांना घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी शेअर रिक्षा, पीएमपी यांची मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठीचा आराखडा सुरू आहे. रिक्षांचे दरही ठरवून दिले आहेत. आता मेट्रो स्थानकांपासून पीएमपी प्रवाशांना सहज उपलब्ध होईल, यासाठी मार्गांचे फलक व वेळापत्रक लावणे आदी कामे तातडीने पूर्ण केली जातील. मेट्रोची सध्याची सरासरी प्रवासी संख्या ५५ हजार असून, ती वाढविण्यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती हर्डीकर यांनी दिली.