Vande Bharat Express
Vande Bharat Express Tendernama
पुणे

Pune : 75 'वंदे भारत एक्स्प्रेस'चे रेल्वेला का 'जड झाले ओझे?'

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’चे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत देशांत ७५ वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) धावतील असे उद्दिष्ट ठेवले. मोदी यांनी ठेवलेल्या लक्ष्यपूर्तीसाठी आता रेल्वेची धडपड सुरू झाली आहे. १ एप्रिल २०२३ पर्यंत देशात ११ वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. उर्वरित १३६ दिवसांत १६ डब्यांच्या ६४ वंदे भारत एक्स्प्रेसचे उत्पादन करणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने १६ डब्यांऐवजी आता ८ डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. परिणामी ७५ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे उद्दिष्ट गाठणे सोपे होणार आहे.

देशात सध्या केवळ चेन्नई येथील आयसीएफ (इंटिग्रल कोच फॅक्टरी) येथे वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांची निर्मिती केली जाते. एमसीएफ (मॉडर्न कोच फॅक्टरी) व आरसीएफ (रेल कोच फॅक्टरी) येथेदेखील डब्यांची निर्मिती करण्याचे नियोजन आहे. मात्र प्रत्यक्षात अजून तिथे डब्यांची निर्मिती सुरू झालेली नाही. ‘आयसीएफ’ येथे महिन्याला १६ डब्यांचे ३ ट्रेन सेट तयार केले जातात.

महिन्याला तीन गाड्या याप्रमाणे विचार केला तर १३६ दिवसांत १६ डब्यांचे सुमारे १२ वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती होईल. ८ डब्यांची रेल्वे केली तर २४ वंदे भारत एक्स्प्रेस धावतील. मात्र तरी देखील उद्दिष्टापेक्षा ती संख्या कमीच ठरते. त्यामुळे रेल्वे मंत्रालय आता ८ डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस अन्य कारखान्यांतून सुरू करण्यासाठी धावाधाव करीत आहे.

अशी असेल ८ डब्यांची गाडी
२ - ड्रायव्हिंग कोच (चालक व गार्ड केबिन)
५ - चेअर कार कोच
१ - एक्झिक्युटिव्ह कोच

का घेतला निर्णय
१. ७५ वंदे भारत एक्स्प्रेसचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी, असे बोलले जात आहे.
२. बहुतांश मार्गावरच्या वंदे भारत एक्सप्रेसना प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद नाही.
३. प्रवासी संख्या कमी असल्याने निम्म्याहून अधिक सीट रिकामे राहतात.
४. ८ डब्यांची रेल्वे केल्यास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे असे दर्शविता येईल.
५. एकाचवेळी दोन नवीन गाड्या सुरू करणे सोपे होईल.

या ११ मार्गांवर धावते ‘वंदे भारत’
१. वाराणसी-नवी दिल्ली (देशातील पहिली ‘वंदे भारत’ सुरवात - १५ फेब्रुवारी २०१९)
२. नवी दिल्ली-कटरा
३. मुंबई सेंट्रल-गांधीनगर
४. नवी दिल्ली-अंब अदौरा
५. चेन्नई-म्हैसूर
६. बिलासपूर-नागपूर
७. हावडा- जलपायगुडी
८. सिकंदराबाद-विशाखापट्टणम
९. मुंबई-सोलापूर
१०. मुंबई-शिर्डी
११. भोपाळ-नवी दिल्ली (१ एप्रिल २०२३ रोजी सुरू)

रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार ८ डब्यांच्या वंदे भारत एक्स्प्रेसचे उत्पादन सुरू झाले आहे. ८ डब्यांची एक गाडीदेखील तयार झाली असून, ती लवकरच चेन्नई-कोइमतूर दरम्यान धावेल.
- जी व्यंकटेशन, जनसंपर्क अधिकारी, आयसीएफ (चेन्नई)

प्रवाशांचा प्रतिसाद कमी लाभत असेल तर हा निर्णय योग्य आहे. मात्र लक्ष्यपूर्तीसाठी दोन गाड्या तयार करण्यासाठी जर असे केले जात असेल, तर ते योग्य नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
- सुधांशू मणी, वंदे भारत एक्स्प्रेसचे निर्माते, निवृत्त सरव्यवस्थापक, आयसीएफ (चेन्नई)