Railway Station
Railway Station Tendernama
पुणे

Pune : बापरे! पुणे रेल्वे स्थानकावरून 11 महिन्यांत धावल्या 64 हजार रेल्वे गाड्या

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुण्याहून धावणाऱ्या प्रवासी व मालवाहू रेल्वेगाड्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत प्रवासी गाड्यांची संख्या १२ टक्क्यांनी वाढली आहे. अशीच स्थिती मालगाड्यांची देखील आहे. चालू आर्थिक वर्षातील ११ महिन्यांत पुणे स्थानकावरून सुमारे ६४ हजार रेल्वे धावल्या आहेत. मागील आर्थिक वर्षात ५६ हजार ६९९ रेल्वे धावल्याची नोंद आहे.

कोरोनापूर्वी पुणे स्थानकावरून धावणाऱ्या प्रवासी गाड्यांच्या तुलनेत आताची संख्या सर्वाधिक आहे. या स्थानकावरून दररोज धावणाऱ्या प्रवासी गाड्यांची संख्या १३८ हून १५१ झाली आहे, तर मालगाड्यांची संख्या ३२ हून ४५ झाली आहे, तर विभागात दररोज धावणाऱ्या प्रवासी गाड्यांची संख्या १७१ हून १९४ झाली आहे.

प्रवासी रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. मात्र जास्तीच्या गाड्या सेक्शनमधून धावत असल्याने काही प्रमाणात रेल्वे गाड्यांनादेखील उशीर झाला आहे. प्रवासी गाड्यांमध्ये सर्व प्रकारच्या मेल एक्स्प्रेस व सुपरफास्ट दर्जाच्या गाड्यांचा समावेश आहे.

'या' वाढल्या रेल्वे

पुणे स्थानकावरून धावणाऱ्या प्रवासी रेल्वेत अयोध्यासाठी चालविलेली आस्था विशेष रेल्वे, ‘आयआरसीटीसी’ने भारत गौरव यात्रेसाठी सुरू केलेली रेल्वे तसेच सुटीच्या काळात सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. दिवाळी, होळी व उन्हाळ्यात अतिरिक्त गाड्या सोडण्यात येतात, त्यामुळे प्रवाशांची व्यवस्था होते.

पुणे स्थानकावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या जास्त असताना प्रशासनाने वेळेचे सूक्ष्म नियोजन केले. प्रवाशांची सोय व्हावी म्हणून जास्तीत जास्त गाड्या चालविण्याचा प्रयत्न केला आहे.

- सचिन पाटील, सहाय्यक परिचालन व्यवस्थापक, रेल्वे विभाग, पुणे