Sinhgad Road Traffic
Sinhgad Road Traffic Tendernama
पुणे

PWDचा प्रताप; सिंहगड रोडवर इथे दररोज का लागताहेत वाहनांच्या रांगा?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : नाताळाची सुट्टी व अवघ्या काही दिवसांवर आलेले नवीन वर्ष या पार्श्वभूमीवर खडकवासला, सिंहगड, पानशेत या भागात येणाऱ्या पर्यटकांच्या जीवाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्धवट कामांमुळे धोका निर्माण झालेला आहे. वाहनांची संख्या वाढल्याने अर्धवट कामाच्या ठिकाणी दररोज सकाळ-संध्याकाळ मोठी वाहतूक कोंडी होत असून, त्याचा फटका पर्यटकांसह स्थानिकांनाही बसत आहे.

खडकवासला धरण चौक व गोऱ्हे बुद्रुक येथे रस्त्याच्या एका बाजूचे काम करण्यात आले आहे, मात्र त्यानंतर अनेक दिवस उलटून गेले तरीही अद्याप दुसऱ्या बाजूचे काम करण्यात आलेले नाही. परिणामी अगोदरच अरुंद असलेला रस्ता सध्या अर्धाच वापरात आहे. दोन्ही बाजूंची वाहने एकाच बाजूने ये-जा करत असल्याने सकाळ-संध्याकाळ नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे सातत्याने अपघात होत असून, अनेक नागरिक जखमी झाले आहेत, तर काहींना जीवही गमवावा लागलेला आहे. सध्या पर्यटकांची संख्या वाढल्याने अपघातांमध्ये वाढ होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी या भागात येणाऱ्या पर्यटकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

काही गोष्टींचा विचार करून खोदकाम करायला हवे होते ते न झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना मी याबाबत तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले आहे. वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी पुढील काही दिवस आवश्यक ती खबरदारी घेण्यात येईल.

- अतुल चव्हाण, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग