पुणे (Pune) : पीएमपीची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पावले उचलण्यास सुरूवात झाली आहे. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ताब्यात असलेल्या साडेपाच एकर जागेचे पीएमपीला हस्तांतर करण्यात आले आहे. तीन ठिकाणची जागा पीएमपीच्या ताब्यात आली असून त्यापैकी दोन जागेत ई-आगार व सीएनजी आगार सुरु केले जाणार आहे. त्यांच्या विकासाचे काम पिंपरी-चिंचवड महापालिकेने करावे, असा प्रस्ताव पीएमपी प्रशासनाने दिला आहे.
‘पीएमआरडीए’ने आपल्या ताब्यातील भोसरी, रावेत आणि मोशी येथील साडेपाच एकर जागा पीएमपीला हस्तांतर केली आहे. पीएमपी प्रशासन वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तिन्ही जागेवर नवीन आगार बांधणार आहे. रावेत येथे सीएनजीचे आगार असेल तर मोशी व भोसरी येथे विद्युत बससाठी ई- आगार बांधण्यात येणार आहे. या तिन्ही जागेत बसेस लावण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. नवीन आगारांमुळे बसेसची संख्या वाढण्यास मदत होईल. त्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल.
पुणे-पिंपरीत २० आगार
पीएमपी आगारांची संख्या सध्या १५ आहे. यात पाच ई- आगार आहेत. हिंजवडी व चऱ्होलीत दोन नवीन ई-आगार सुरु होणार असून त्यामुळे आगारांची संख्या १७ होणार आहेत. भोसरी व मोशी येथे प्रत्येकी एक ई-आगार व रावेत येथे एक सीएनजी आगार होणार आहे. त्यामुळे पीएमपीचे २० आगार होणार आहेत.
नवीन आगारांमुळे या सुधारणा होणार
१) नवीन आगारांमुळे भोसरी व निगडीतील सध्याच्या वाहतूक सुविधांवर असणारा ताण कमी होणार
२) आगारांची संख्या वाढल्याने बसेसच्या संख्येत वाढ होणार
३) पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएच्या भागात पीएमपी सेवा देण्यास अधिक सक्षम होणार
४) पीएमपीच्या बिगरप्रवासी वाहतुकीत घट होणार
पीएमपी दृष्टीक्षेपात...
२०७२
- बसची संख्या
१७६०
- प्रवासी सेवेत
१२ लाख
- प्रवासी संख्या (दैनंदिन)
७,२५६ चौ.कि.मी.
- सेवेचे क्षेत्र
३८५
- बसचे मार्ग
१ कोटी ७० लाख
- प्रवासी उत्पन्न (दैनंदिन)
८,५००
- कर्मचारी
‘पीएमआरडीए’च्या तीन जागांचे हस्तांतर पीएमपीकडे केले आहे. हा निर्णय पीएमपीसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रवासी सुविधा वाढणार आहेत. तिन्ही जागांचा वापर आम्ही आगारांसाठी करणार आहोत. याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.
- नितीन नार्वेकर, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल