Pune PMC Tendernama
पुणे

PMC : महापालिकेच्या 'त्या' अधिकाऱ्यांवर आयुक्त कारवाई करणार का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मुंढव्यातील महात्मा गांधी चौकातून महात्मा फुले चौकाकडे जाण्यासाठी असलेल्या पदपथावर जाहिरातीसाठी लोखंडी सांगाडा उभारला आहे, त्यामुळे पादचाऱ्यांना येथून चालणे अवघड झाले आहे.

वाहनांच्या वर्दळीतून पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. पादचाऱ्यांसाठी असलेल्या पदपथावर फलकांचे अतिक्रमण झाल्यामुळे नागरिकांनी चालायचे कुठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महात्मा फुले चौकात सिग्नल असल्यामुळे महात्मा गांधी चौकात वाहने थांबलेली असतात. पादचाऱ्यांना येथून मार्गक्रमण करताना लोखंडी सांगाड्याची पट्टी वाकवून जावे लागते. ज्येष्ठ नागरिकांची मात्र येथून जाताना तारांबळ उडते.

पदपथावर फलक लावण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही महापालिका आयुक्तांनी कारवाई करावी तसेच जाहिरात फलक काढावा, मुंढवा केशवनगरमधील अनधिकृत फलक काढावेत, अशी मागणी अॅड. राजशेखर गायकवाड यांनी केली आहे.

याबाबत आकाशचिन्ह व परवाना विभागाचे निरिक्षक योगेश काकडे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.