पुणे (Pune): येरवडा येथील राज्य शासनाची जागा महामेट्रो प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. संबंधित जागेवरील शैक्षणिक संकुलाचे आरक्षण वगळून ही जागा महामेट्रोला देण्यासाठीची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. महापालिकेने त्यासंबंधी हरकती व सूचना मागविण्यास सुरवात केली आहे.
येरवडा येथे राज्य सरकारची १५ हजार ९५४ चौरस मीटर इतकी जागा आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये संबंधित जागेवर शैक्षणिक संकुलाचे आरक्षण टाकण्यात आले होते. दरम्यान, राज्य सरकारने महामेट्रो प्रकल्प मार्गी लागण्यासाठी संबंधित जागा महामेट्रोसाठी देण्याचा निर्णय घेतला. महामेट्रो प्रकल्पाचा आराखडा तयार करताना या जागेचा वापर व्यावसायिक संकुलासाठी करण्याचे निश्चित केले होते.
दरम्यान, राज्य सरकारच्या संबंधित जागेवर महापालिकेने शैक्षणिक संकुल आरक्षण टाकले होते, त्यामुळे संबंधित आरक्षण उठविण्याबाबतचे पत्र विभागीय आयुक्तांनी महापालिका प्रशासनास पाठविले होते.
संबंधित पत्रानुसार, महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेमध्ये त्यास मंजुरी दिली. त्यानंतर पुढील टप्प्यानुसार नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. यासंबंधी सप्टेंबर अखेरपर्यंत नागरिकांना सूचना व हरकती मांडता येणार आहेत.
संबंधित जागा राज्य सरकारची आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार ही जागा महामेट्रोला देण्यात येणार आहे. त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
- राजेश भुतकर, कार्यकारी अभियंता