PMC
PMC Tendernama
पुणे

Pune News: G-20 बैठकीच्या निमित्ताने झोपलेल्या 'या' विभागाला जाग

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेने (PMC) G-20 परिषदेसाठी सुशोभीकरण आणि दुरुस्तीची कामे हातामध्ये घेतलेली असताना विद्युत विभागाने ४०० पेक्षा जास्त वापरात नसलेले पण वाहतूक, पादचारी मार्गावर अडथळा ठरणारे खांब काढून टाकले आहेत.

परिषदेसाठी येणारे प्रतिनिधी लोहगाव, विमानतळ ते सेनापती बापट रस्‍त्यावरील पंचतारांकित हॉटेलपर्यंत प्रवास करणार असल्याने या सुमारे १० किलोमीटरच्या रस्त्याची गेल्या काही आठवड्यापासून स्वच्छता, सुशोभीकरण, दुरुस्ती सुरू केली आहे. विद्युत विभागाने या रस्त्यावरील सुमारे एक हजार पथदिव्यांच्या खांबांना रंग दिला आहे. लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्ता, पेठांचा भाग, शिवाजीनगर परिसर यासह इतर भागात जे खांब वापरात नाहीत असे सुमारे ४०० खांब काढून टाकले आहेत. यामध्ये महावितरण, दूरसंचार विभाग आणि महापालिकेच्या खांबांचा समावेश आहे.

महापालिकेच्या विद्युत विभागाकडून इतर वेळी रस्त्यातील खांब काढून टाकण्यासाठी टाळाटाळ केली जाते. निधी उपलब्ध नाही, टेंडर संपले आहे, मनुष्यबळ उपलब्ध नाही अशी कारणे देऊन खांब काढले जात नाहीत. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. पण ‘जी २०’ च्या निमित्ताने १०० कामगार, १० क्रेनच्या साह्याने आणि दिवसा व रात्री काम करून सुमारे ३०० खांब काढेल आहेत.

जी २० परिषदेच्या निमित्ताने विद्युत विभागाकडची जवळपास सर्व कामे पूर्ण झाली आहेत. रस्ते, पादचारी मार्ग यातील वापरात नसलेली ४०० खांब काढून टाकल्याने वाहनांना व नागरिकांचा त्रास कमी झाला. यातील १२० खांब हे विमानतळ ते नागपूर चाळ याच मार्गावरील आहे. तर व्हीआयपी मार्गावरील एक हजार व इतर भागातील ५०० खांबांना रंग देऊन झाला आहे.

- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग