Pune Mula-Mutha Rive
Pune Mula-Mutha Rive Tendernama
पुणे

PMC म्हणते 'या' प्रकल्पामुळे तुम्ही पुन्हा पुण्याच्या प्रेमात पडाल

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेकडून (PMC) नदी सुधार प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पातंर्गत नदी काठ सुधारणा करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात अहिल्यादेवी घाट ते बंडगार्डन या दरम्यान ३०० मीटरचा नदीकाठ सुधारणेच्या प्रकल्पाचे काम जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.

गुरुवारी महापालिका आयुक्त कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह शहरातील क्रेडाई, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना, नॅरडोको यासह काही संस्थांच्या प्रतिनिधींनी घेऊन प्रकल्पाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

शहराची जीवनदायिनी असलेल्या मुठा नदीकडे पाठ न करता तिच्या काठावर विसावा घेण्यासाठी नदी सुधार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून पर्यावरणाचे देखील रक्षण होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला पुणेकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी यावेळी केले.

प्रायोगिक तत्त्वावर करणाऱ्यात आलेल्या नदीकाठ सुधारणेमध्ये अहिल्यादेवी घाटाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच ठिकठिकाणी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. पादचाऱ्यांसाठी पथवे तयार करण्यात आला असून आकर्षक अशी रचना करण्यात आली आहे.

या पाहणी दरम्यान आयुक्त म्हणाले, महापालिकेने हाती घेतलेला हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. तसेच जैववैविध्यते रक्षण होणार आहे. या प्रकल्पातंर्गत नदी शंभर टक्के प्रदूषणमुक्त करण्यासाठी जायका प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पातंर्गत ११ मैलपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या माधमातून नदीत स्वच्छ पाणी सोडण्यात येणार आहे. नदी प्रदूषणामुळे नदीकडे पाठ करून पुणेकर जातात. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर हे चित्र नक्की बदलेल. त्यासाठी पुणेकरांनी देखील पुढे येऊन आपला सहभाग नोंदवावा.

यावेळी नदी सुधार योजना प्रकल्पाची माहिती बांधकाम विभागाचे युवराज देशमुख आणि सुरेंद्र करपे यांनी संस्थेच्या प्रतिनिधींना देण्यात आली. तसेच या प्रकल्पासाठी आवश्‍यक ते सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

या प्रकल्पामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने वृक्ष लागवड महापालिकेकडून केली जाणार आहे. त्यामध्ये सहभाग घेण्याची तयारी बांधकाम व्यावसायिक संघटनांनी तसेच काही स्वयंसेवी संस्थांनी दाखविली आहे. शहराच्या लिव्हेबल इंडेक्समध्ये वाढ होईल.

- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका