PCMC Tendernama
पुणे

Pimpri : रुग्णालयांच्या कारभाराबाबत महापालिकेने घेतला मोठा निर्णय

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या सर्व रुग्णालयांचा कारभार डिजीटलायजेशन करून जोडण्यात येणार आहे. त्‍याअंतर्गत रुग्णांना ‘स्‍मार्ट हेल्‍थ कार्ड’ दिले जाणार आहे. त्‍यामधून रुग्णाच्‍या आजार आणि उपचाराचा इतिहास कळणार आहेच. त्‍याबरोबरच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व रुग्णालयांच्या कामकाजाची माहिती पाहता येणार आहे. येत्या पाच महिन्‍यांत ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्‍याचे वैद्यकीय विभागाचे म्‍हणणे आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाअंतर्गत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी शहरात आठ रुग्णालये आणि ३२ दवाखाने आहेत. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय, नेत्र रुग्णालय, आकुर्डी, पिंपरी, थेरगाव आणि चिंचवड येथील रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची माहिती डिजिटल स्वरूपात जतन करता यावी, यासाठी २०१० पासून ‘ई - हेल्थ कार्ड’ प्रणाली सुरू करण्यात आली होती. या ‘हेल्थ कार्ड’चे एका खासगी कंपनीकडे काम सोपविण्यात आले होते.

सध्याची प्रक्रिया कोणती ?

‘वायसीएम’ मध्ये पीव्हीसी स्मार्ट कार्ड स्वरुपातील ‘हेल्थ कार्ड’ देणे बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी एका चिठ्ठीवर हे कार्ड प्रिंट करुन दिले जात आहे. त्यामुळे रुग्णांचा डिजिटल डाटा जतन करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सुरुवातीला नवीन कार्ड काढताना ३० रुपये आणि नंतरच्या उपचारासाठी दरवेळी दहा रुपये केस पेपरसाठी घेतले जात होते. मात्र, करोनामध्ये २०२० पासून हे ‘हेल्थ कार्ड’ बंद करण्यात आले. आता टोकनच्या चिठ्ठीवर हे कार्ड प्रिंट करुन दिले जात आहे.

काय फायदे होणार ?

- टोकन चिठ्ठीऐवजी ‘स्‍मार्ट हेल्‍थ कार्ड’चा वापर

- रुग्णाचा आजार आणि उपचाराची पार्श्वभूमी कळणार

- सर्वच रुग्णालयांचा कारभार ऑनलाइन करणे शक्य

- रुग्ण संख्येसह एकत्रित माहिती वैद्यकीय विभागाकडे संकलित होणार

महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी केंद्रीय डिजिटल प्रणाली सुरू करणार आहे. त्यामुळे ‘हेल्थ कार्ड’ बंद करुन रुग्णांना नवीन ‘स्मार्ट हेल्थ कार्ड’ दिले जाणार असून व्यवस्थापन यंत्रणेसाठी टेंडर प्रक्रियेचे काम चालू आहे. पाच महिन्‍यांत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.

- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका