Metro Tendernama
पुणे

PCMC : पिंपरी चौक ते मोरवाडी चौक मार्गावर का होतोय वाहतुकीचा खोळंबा?

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : मेट्रो आणि अर्बन स्ट्रिटचे काम सुरू असल्याने पिंपरी चौक ते मोरवाडी चौक हा मार्ग आणखी अरुंद बनला आहे. परिणामी, वाहतुकीची समस्या उद्‍भवत आहे.

येथील कामाचा वेग संथ असल्याने यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील कामे तत्काळ पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक वाहन चालकांकडून करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात अर्बन स्ट्रिटचे काम सुरू आहे. त्यानुसार पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते निगडीपर्यंत आगामी काही दिवसांत अर्बन स्ट्रिटची कामे होणार आहेत. या कामांना सुरुवात झाली असून, आंबेडकर चौकातील काम पूर्ण झाले आहे.

मोरवाडी चौक ते चिंचवड येथील एम्पायर इस्टेट पर्यंतचे काम अर्धवट आहे. तसेच पिंपरी येथील ज्वेल ऑफ पिंपरी इमारतीसमोर मेट्रोच्या पिलरचे बांधकाम होत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत.

एकीकडे अर्बन स्ट्रिट तर दुसरीकडे मेट्रोचे काम यामुळे हा मार्ग अरुंद बनला असून, रस्त्याच्या बाजूला असलेल्या पार्किंगमुळे वाहने रस्त्याच्या मधोमध पार्क होत आहेत. परिणामी, वाहतूक समस्या उद्भवत आहे. चालकांना वाहन पार्क करण्यास जागा उपलब्ध होत नसल्याने नो पार्किंग झोनमध्ये वाहने पार्क करण्यात येत आहेत.

कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडीच्या समस्येचा त्रास सहन करावा लागत आहे. कामाचा वेग संथ गतीने सुरू असल्याने स्थानिक वाहन चालकांनी येथील कामे तत्काळ पूर्ण करण्यात यावी अशी मागणी केली आहे.