Pimpri Chinchwad Tendernama
पुणे

PCMC : थेरगाव - चिंचवडकरांचा प्रवास अधिक सुलभ होणार; 'तो' प्रश्न अखेर मार्गी

टेंडरनामा ब्युरो

वाकड (Wakad) : थेरगाव आणि चिंचवडकरांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी पवना नदीवर महापालिकेने बांधलेल्या थेरगाव - चिंचवड लिंक बास्केट पुलाच्या जोडरस्त्याचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. महिन्याभरात जोडरस्त्याचे डांबरीकरण होऊन लवकरच पूल वापरासाठी खुला होणे अपेक्षित आहे.

थेरगाव आणि चिंचवडकरांची मोठा वळसा मारून सुरू असलेली ये-जा थांबावी, मोरया गोसावी मंदिर परिसरातील वाहतूक कोंडीत न अडकता दोन्ही गावांतील नागरिकांचा प्रवास झटपट व्हावा या उद्देशाने महापालिकेने पवना नदीवर समांतर बास्केट पूल बांधण्यात आला होता. मात्र वर्षभरापासून जोड रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे तो वापराविना धूळखात पडून आहे.

साधारणतः वर्षापूर्वी पुलाचे काम सुरू झाले. थेरगावातील समर्थ करिना सोसायटी ते चिंचवडगाव गुरुकुलम संस्थेजवळ सुमारे शंभर मीटर लांबीचा आणि १८ मीटर रुंदीच्या मार्गाकरिता सुमारे ३० कोटी खर्च आला आहे. पुलाला जोड असलेल्या रस्त्यांपैकी थेरगाव भागातील रस्ता पूर्ण झाला आहे. मात्र, चिंचवडकडील रस्त्याचे काम अद्याप बाकी होते. काही हाऊसिंग सोसायट्या व शेतकऱ्यांनी रस्त्यास विरोध केल्याने जोड रस्त्याचे किरकोळ भूसंपादन रखडले होते.

चिंचवडकडील भूसंपादनाचा विषय आता मार्गी लागल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. चिंचवड गावातील चापेकर क्रांतीतीर्थ स्मारकाचे उद्‍घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते.

त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री शहरातील आमदार, खासदार तसेच राज्यभरातील नेते मंडळी उपस्थित राहणार होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची रंगरंगोटी केली. तसेच पुलाचे डांबरीकरण केले. या सर्व कामांची पाहणी देखील स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांनी केली होती.

सोसायटीच्या हद्दीचा वाद तसेच शेतीला जाण्याचा रस्ता बंद होईल या भीतीने काही शेतकऱ्यांनीही रस्त्याला विरोध केला होता. मात्र, सामोपचाराने प्रश्न सुटला असून सर्व जागा ताब्यात आली आहे. महिन्याभरात जोड रस्त्याचे डांबरीकरण होऊन पूल वापरात येईल.

- मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका