PCMC Tendernama
पुणे

PCMC : केवळ महिनाभरातच पालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली; नेमकं काय घडलं?

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : शहरातील महामार्गांसह मोठे रस्ते आणि अंतर्गत भागातील मोक्याच्या ठिकाणी टोलेजंग होर्डिंग उभारले आहेत. यात काही अधिकृत, तर बहुतांश अनधिकृत आहेत.

दरवर्षी एप्रिल, मे, जून या कालावधीत वादळी वारे, अवकाळी पाऊस यामुळे होर्डिंग कोसळून जीवित आणि वित्तहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व होर्डिंग १५ जूनपर्यंत रिकामे ठेवण्याचा अर्थात त्यावर कोणतेही जाहिरात फलक न लावण्याचा आदेश पालिका आयुक्तांनी दिला. तरीही ९० टक्क्यांपेक्षा अधिक जाहिरात फलक जैसे-थे असल्याचे व आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे पाहणीत आढळून आले.

शहरातील सर्व होर्डिंग परवानाधारकांची महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी नऊ एप्रिल रोजी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी शहरातील सर्व होर्डिंग रिकामे ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यास सर्व होर्डिंगधारकांनी सहमतीही दर्शविली. या बैठकीला महिना होत आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातील अतिहरदारीच्या आठ रस्त्यांवरील होर्डिंगची पाहणी केली. त्यामध्ये होर्डिंगवर अजूनही वेगवेगळ्या जाहिराती लावलेल्या आढळले. पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी-प्राधिकरणातील राजा शिवछत्रपती चौकालगत गेल्या वर्षी होर्डिंग कोसळले होते. त्याखाली पाच-सहा दुकाने व वाहने सापडून नुकसान झाले होते.

आता त्या परिसरात ओळीने होर्डिंग उभे आहेत. त्यावर जाहिरातीही झळकत आहेत. शहरातील विविध भागांत अशीच स्थिती असून होर्डिंगचा धोका कायम आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे आढळले.

काय आढळले...

- बहुतांश होर्डिंगवर जाहिराती कायम

- काही जाहिरात फलकांना हवा जाण्यासाठी छेद केले आहेत

- एका सांगाड्यावर दोनपेक्षा अधिक फलक

- परवाना एका होर्डिंगचा, प्रत्यक्षात अनेक

- बोटावर मोजण्याइतके होर्डिंग रिकामे

- परवानाधारक होर्डिंग कंत्राटदारांचे संपर्क क्रमांकाचे फलक कायम

- एका होर्डिंगवर दोन्ही बाजूंला फलक

- गेल्या वर्षी उंची कमी केलेल्या अर्धवट सांगाड्यांवरही फलक

पाहणी केलेले रस्ते आणि होर्डिंग

(रस्ते / जाहिराती असलेले / रिकामे / एकूण)

डुडुळगाव ते मोशी / ३६ / ०५ / ४१

भोसरी ते पिंपरी चौक / ०९ / ०५/ १४

निगडी ते मोरवाडी चौक / १५ / ०० / १५

दापोडी ते मोरवाडी चौक / ०८ / ०० / ०८

काळेवाडा फाटा ते ऑटो क्लस्टर / १८ / ०१ / १९

रावेत ते किवळे / ०८ / ०० / ०८

तळवडे ते निगडी / १५ / ०७ / २२

रावेत ते डांगे चौक / ३३ / ०० / ३३

एकूण / १४२ /१८ / १६०

(एकूण आकडा होर्डिंग सांगाड्यांचा आहे. एका सांगाड्यावर एकापेक्षा अधिक जाहिरात फलक आहेत. त्यामुळे जाहिरातींची संख्या किमान दुप्पट आणि कमाल चौपट फलक असावेत)