Chandani Chowk Tendernama
पुणे

Pune : चांदणी चौकात पादचाऱ्यांसाठी पावसाळ्यापूर्वी गुड न्यूज

टेंडरनामा ब्युरो

तापुणे (Pune) : चांदणी चौकात पादचारी मार्ग (फूट ओव्हर ब्रीज) उभारण्याचे काम मागील दोन महिन्यापासून सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करून नागरिकांना पादचारी मार्ग खुला करण्याचे नियोजन असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआई) देण्यात आली.

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कोट्यवधी रुपये खर्च करून चांदणी चौकात उड्डाणपूल बांधला. मात्र, उड्डाणपूल बांधताना पादचाऱ्यांना विचार न केल्याने मागील दीड वर्षापासून दररोज हजारो पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. आता पादचारी मार्ग पावसाळ्यापूर्वी खुला झाल्यास प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पादचारी उड्डाणपूल उभा करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्र देऊन केली होती.

शंभर मीटरचा पादचारी मार्ग

चांदणी चौकातील एसटीचा नवीन बस थांबा ते इराणी कॅफे बावधन असा १०० मीटरचा लोखंडी पादचारी मार्ग उभारण्याचे काम कोल्हापूर येथील ‘एमडी इंफ्रा’ या कंपनीला देण्यात आले आहे. यासाठी जवळपास पाच कोटी रुपये खर्च होणार आहेत.

अधिकृत बसथांब्याची मागणी

मुंबईहून कोल्हापूरकडे जाताना चांदणी चौक येथे अधिकृत बसथांबा नाही. विद्यार्थी, नोकरदारांना कोल्हापूरला बसने जायचे झाल्यास किंवा चौकात खाली उतरायचे असल्यास अधिकृत बसथांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. या अनुषंगाने कोथरूड, बावधन, कर्वेनगर येथील रहिवाशांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, स्वारगेट आगार येथे निवेदन देऊन चांदणी चौकात अधिकृत बसथांबा करण्याची मागणी केली आहे.

पादचारी मार्ग नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. लहान मुले सोबत असल्यावर रस्ता ओलांडता येत नाही. रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी रिक्षावाले जवळपास दीडशे ते दोनशे रुपये प्रवास खर्चाची मागणी करतात. पादचारी मार्ग लवकर खुला झाल्यास प्रवाशांची गैरसोय निश्चितच कमी होईल.

- प्राजक्ता पाटील, प्रवासी