पुणे (Pune): पुणे - नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता कायम मिटणार असून, नाशिक फाट्यापासून राजगुरुनगर पर्यंतचा प्रवास आता एकदम सुसाट होणार आहे. त्यामुळे पुणे नाशिक मार्गावरील कोंडीला वैतागलेल्या या भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली असून, नाशिक फाटा ते राजगुरुनगर या १६ पदरी उन्नत मार्गाचे टेंडर गुरुवार (ता. २५) उघडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या महामार्गासाठी जमीन अधिग्रहणासाठी शासकीय पातळीवर गती देण्यात आली आहे. उन्नत मार्ग झाल्यानंतर चाकणसह याभागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येईल, असेही गडकरी म्हणाले.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांतील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासह पुणे येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भागातील वाहतूक कोंडी व पेठ, तांबडेमळा-मंचर, एकलहरे-कळंब (ता. आंबेगाव), नारायणगाव, आळेफाटा (ता. जुन्नर) येथे बाह्य वळणाच्या सुरवातीला व शेवटी वारंवार अपघात व जीवितहानी होत आहे. ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
या ठिकाणी उड्डाणपूल अथवा भूमिगत मार्ग तातडीने करण्याबाबत प्रशासनाला आदेश द्यावेत. नारायणगाव ते खोडद चौक येथील उड्डाणपुलाचे काम मंदगतीने सुरू आहे. त्या कामाला गती द्यावी, अशी मागणीही मेदगे यांनी केली.
राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम म्हणाले, माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या पत्रानुसार एकलहरे व तांबडेमळा येथे उड्डाणपूल मंजूर झाले असून टेंडर प्रक्रिया सुरू आहे. नारायणगाव ते खोडद चौक उड्डाणपुलाच्या कामाला गती दिली जाईल.
नाशिकफाटा ते राजगुरुनगर हा रस्ता आठ पदरी जमिनीवर व उन्नत पुलावरती आठ पदरी असा एकूण १६ पदरी रस्ता होणार आहे. रस्त्याची मंजूर किंमत सात हजार ८२७ कोटी रुपये आहे. या ३० किलोमीटर मधील अंतरातील जमीन अधिग्रहणासाठी राज्य शासनाच्या वतीने गती देण्यात आली आहे.
- संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग