Narendra Modi Tendernama
पुणे

Narendra Modi : 2014 नंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवडमध्ये; काय आहे कारण?

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : पिंपरी-चिंचवड शहराची ऐतिहासिक ओळख म्हणजे क्रांतिकारी चापेकर बंधूंचे चिंचवडगावातील स्मारक. यासह चापेकर वाडा अर्थात क्रांतीतीर्थाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते १८ एप्रिल रोजी होणार आहे.

चिंचवडमधील चापेकरवाडा हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा वारसा आहे. चापेकर बंधूंनी इंग्रजांविरोधात लढा देत बलिदानाने स्वातंत्र्याच्या लढ्याला प्रेरणा दिली होती. या पार्श्वभूमीवर, चापेकर स्मारकनिर्मिती आणि त्याचे उद्‍घाटन हा शहरासाठी ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.

चापेकर बंधूंसह देशातील क्रांतिवीरांच्या गाथा आणि चित्रांचा मोठा संग्रह या स्मारकात पाहायला मिळणार आहे. याचे उद्‍घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, यानिमित्त ते दुसऱ्यांदा शहरात येणार आहेत. पहिल्यांदा ऑक्टोबर २०१४ मध्ये विधानसभा निवडणूक प्रचारानिमित्त मोदी शहरात आले होते. त्यानंतर आता त्यांचा दौरा होत आहे. त्यामुळे ते शहराविषयी काय बोलतील, याची सर्वांना उत्सुकता आहे.

या लोकार्पण कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी महापालिकेकडून जोरदार तयारी सुरू आहे. सुरक्षा व्यवस्थाही काटेकोरपणे राबवली जात आहे.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत आमदार आणि स्मारक समिती पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक यापूर्वी झाली आहे. मोदी यांच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाला संजीवनी मिळणार असून, चापेकर बंधूंचे स्मारक ही देशभक्ती आणि त्यागाची साक्ष देणारी ऐतिहासिक वास्तू म्हणून भविष्यात ओळखली जाईल.

यापूर्वी ऑनलाइन...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यापूर्वी शिवाजीनगर-पिंपरी (पीसीएमसी) मेट्रो मार्गाचे उद्‍घाटन, पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो मार्गाचे भूमिपूजन, मोशीतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे उद्‍घाटन झाले आहे. मात्र, हे सर्व कार्यक्रम ऑनलाइन झाले आहेत.

तसेच, ‘चाय पे चर्चा’, ‘परीक्षा पे चर्चा’ ऑनलाइन कार्यक्रमात त्यांनी पिंपरी-चिंचवडचा ओझरता उल्लेख केला होता. आता पंतप्रधान मोदी प्रत्यक्ष शहर दौऱ्यावर येत असून १८ एप्रिल रोजी सकाळी दहा ते दुपारी एक असा तीन तासांचा वेळ त्यांनी शहरासाठी दिला आहे.