E Shivneri
E Shivneri Tendernama
पुणे

MSRTC: नव्याकोऱ्या ई-शिवनेरी बस जागेवरून हालेचनात; हे आहे कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) १६ ई-शिवनेरी बस (E- Shivneri Bus) चार्जर अभावी धूळखात पडून आहे. पुण्यातील स्वारगेट डेपो व ठाणे डेपोतील चार्जिंग स्टेशनचे (Charging Station) काम अद्यापही अपूर्ण आहे. त्यामुळे पुणे-मुंबई (Pune - Mumbai) महामार्गावर ई-शिवनेरी धावण्यास आणखी विलंब लागणार आहे. एप्रिलमध्ये सुरू होणारी ई-शिवनेरी आता मे महिन्यात रस्त्यावर धावण्याची शक्यता आहे.

सध्या ई-शिवनेरी बस पूर्णतः तयार आहे. ही ओलेक्ट्रा कंपनीची बस असून एसटी महामंडळाकडे बस ठेवण्यास जागा नसल्याने ओलेक्ट्राने पीएमपीच्या निगडी डेपोत काही दिवसांसाठी ही शिवनेरी बस ठेवली आहे. पुणे विभागात स्वारगेट व पुणे स्टेशन डेपोत चार्जिंगची सुविधा असणार आहे. मात्र, अद्याप दोन्ही ठिकाणी चार्जिंगचे काम अपूर्ण आहे. तर ठाणे डेपोतही हीच परिस्थिती आहे. तिथेही चार्जिंगसाठी सिव्हिल काम झाले. मात्र, चार्जर बसविण्याचे व अन्य काही तांत्रिक कामे अपूर्ण आहे. त्यामुळे ही सेवा मे महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

चार्जर दाखल, पण जोडणी नाही -
स्वारगेट डेपो व पुणे स्टेशन डेपोमध्ये सध्या सहा चार्जर आहेत. बसची संख्या वाढणार असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या विद्युत विभागाकडून आवश्यक ती कामे केली जात आहेत. स्वारगेट डेपोत १७ चार्जर, तर पुणे स्टेशन डेपोत ६ चार्जर बसविले जाणार आहे. दोन्ही डेपोसाठी २३ चार्जर दाखल झाले आहे. मात्र, ते बसविण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. चार्जिंग स्टेशनची जबाबदारी संबंधित बस कंपनीची म्हणजे ओलेक्ट्रा कंपनीची आहे. त्यासाठी आवश्यक असलेला विद्युत पुरवठा उपलब्ध करून देण्याचे काम एसटी प्रशासनाचे आहे.

सध्या स्वारगेट डेपोला २,२५० किलोवॉटचा विजेचा पुरवठा होतो, मात्र एसटी प्रशासनाने तो वाढवून ४ हजार किलोवॅट इतका केला आहे. या चार्जिंग स्टेशनमध्ये १५० व ९० किलोवॉटचा चार्जरचा समावेश आहे. एक बस चार्ज करण्यासाठी सुमारे दीड ते दोन तासाचा वेळ लागतो. बस चार्ज झाल्यावर ३०० किमीपर्यंत धावेल. चार्जिंग स्टेशनसाठी पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे.

पुण्याहून ई-शिवनेरी, शिवाई धावणार
सध्या पुण्याहून केवळ नगरसाठी शिवाई बस धावत आहे. मात्र, आता पुण्याहून मुंबई, ठाणे, कोल्हापूर, संभाजीनगर, नाशिक व सोलापूरसाठी शिवाई बस धावणार आहे. तर पुणे-मुंबई महामार्गावर शिवनेरी बस धावणार आहे. नाशिक, संभाजीनगर व सोलापूर येथे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. मार्च अखेरीस ते पूर्ण होणे आवश्यक होते, मात्र अजूनही ते काम सुरूच आहे.

ई-शिवनेरी बसची बांधणी पूर्ण झाली आहे. काही तांत्रिक कामे शिल्लक आहेत. ती पूर्ण होताच बस प्रवाशांच्या सेवेत धावेल. मे महिन्यांत पुणे ते ठाणे दरम्यान ई-शिवनेरी बस धावेल.
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई