Ring Road Tendernama
पुणे

Pune : पुणे, पिंपरीतील वाहतूक कोंडी फोडणाऱ्या रिंगरोडच्या कामाला सुरवात

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडच्या कामाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, ज्या कंपनीला हे काम मिळाले, त्या कंपनीच्या कार्यालय आणि यंत्रसामग्रीच्या पूजनाचा हा कार्यक्रम असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. वाढीव दराचे टेंडर मान्य केल्यामुळे आधीच चर्चेत असलेला रिंगरोड आता भूमिपूजनावरून चर्चेत आला आहे.

महामंडळाकडून पूर्व आणि पश्‍चिम अशा दोन भागांत हा रिंगरोड होणार आहे. पुणे-नगर रस्ता आणि सोलापूर महामार्गाला जोडणाऱ्या २४.५ किमी लांबीच्या रस्त्याचे कंत्राट रोड वेज सोल्यूशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे. केसनंदजवळील वाडेबोल्हाई गावात आज पारंपरिक पद्धतीने पूजा करून कंपनीने प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली. या वेळी रोडवेज सोल्यूशन इन्फ्राचे व्यवस्थापकीय संचालक अमित गाढोके, बी. के. सिंग, कुणाल गुप्ता आणि विशाल घुले पाटील यांच्यासह गावकरी उपस्थित होते. या टप्प्यावरील काम जलद गतीने करण्यासाठी शंभरहून अधिक उत्खनन आणि यंत्रसामग्री सज्ज करण्यात आली, असे कंपनीचे बी. के. सिंग पत्रकाद्वारे कळविले आहे.

सुमारे १७० किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. या रस्त्याच्या कामासाठी महामंडळाने चार टप्पे करून टेंडर मागविले होते. महामंडळाने रस्त्याच्या कामासाठी तयार केलेल्या पूर्वगणनपत्रकापेक्षा (इस्टिमेट) ४० ते ४५ टक्के जादा दाराने टेंडर आले होते. या संदर्भात महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘रिंगरोडच्या कामाचे भूमिपूजन झालेले नाही, तर ज्या कंपनीला हे काम मिळाले आहे. त्या कंपनीने त्यांचे कार्यालय सुरू केले आहे. त्या कार्यालयाचे आणि कामासाठी आणलेल्या यंत्रसामग्रीचे पूजन कंपनीकडून करण्यात आले आहे.’’