मुंबई (Mumbai) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने चिंचवड गाव येथील थेरगावकडे जाण्यासाठी पवना नदीवर बटरफ्लाय आकाराचा बांधण्यात आलेल्या पुलाच्या कामाबाबत लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या मागणीनुसार योग्य ती चौकशी केली जाईल, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरच्या तासावेळी सांगितले.
राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले, या पुलाच्या कामाचे आदेश 2017 मध्ये देण्यात आले होते. जलसंपदा विभागाकडून पुलाच्या कामासाठी ना हरकत दाखला मिळण्यास विलंब झाला होता. जलसंपदा विभागाच्या अभिप्रायानुसार पुलाच्या उंचीत वाढ झाल्याने या कामाच्या रकमेत वाढ झाली. त्यामुळे मूळ टेंडर रकमेमध्ये पुलाचे बांधकाम व चिंचवड बाजूकडील पोहोच रस्त्याचे बांधकाम करणे शक्य होते व त्याप्रमाणे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
थेरगाव बाजूकडील पोच रस्त्याचे काम बाकी राहिल्याने या कामासाठी नवीन स्वतंत्र टेंडर काढून हे काम करण्याचे ठरवण्यात आले त्यानुसार 11.03 कोटी रुपयांचे स्वतंत्र टेंडर काढण्यात येऊन या कामाचे आदेश देण्यात आले. या पुलाच्या कामासंदर्भात लोकप्रतिनिधींच्या भावनांचा विचार करून या कामाची चौकशी केली जाईल, असे राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले. या विषयी सदस्य शंकर जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला होता.