MHADA Pune
MHADA Pune Tendernama
पुणे

MHADA Lottery मोठा प्रतिसाद; अवघ्या १० दिवसांत ५३ हजार अर्ज

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : विविध उत्पन्न गटातील पाच हजार ९१५ सदनिकांसाठी म्हाडाने (MHADA) काढलेल्या सोडतीसाठी दहा दिवसांत सुमारे ५३ हजार नागरिकांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, या घरांसाठी ४ फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना अर्ज करता येणार आहेत.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील म्हाडाच्या विविध योजनेतील दोन हजार ५९४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत दोन हजार ९९० सदनिका व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३९६ सदनिका असे एकूण पाच हजार ९१५ सदनिकांसाठी सोडत जाहीर केली आहे. ५ जानेवारीपासून ऑनलाइन पद्धतीने नोंदणीस सुरवात झाली आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत दोन हजार ९२५ घरे उपलब्ध असून त्यासाठी सुमारे ८०० नागरिकांनी अर्ज केले आहेत.

या घरांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ४ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर ऑनलाइन पेमेंट, अनामत रक्कम भरण्यासाठी अंतिम मुदत-६ फेब्रुवारीपर्यंत असून अंतिम अर्जांची यादी १५ फेब्रुवारी निश्‍चित करण्यात येणार आहे. १७ फेब्रुवारी सोडत काढण्यात येणार आहे.

यंदा म्हाडाने सदनिकांच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी नविन संगणकीय प्रणाली आणली आहे. या नविन प्रणालीनुसार नागरिकांना घरबसल्या संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून नोंदणी, अर्ज भरणे, ऑनलाइन पेमेंट या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे किंवा गुगल प्ले स्टोअर मधून MHADA IHLMS २.० हे मोबाईल ॲपमधून नोंदणी करता येणार आहे.