MHADA
MHADA Tendernama
पुणे

म्हाडाच्या घरांसाठी कागदपत्रांची कटकट मिटली;अवघी ६ कागदपत्रे अन्..

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : म्हाडाच्या योजनेतून घर घेताना कागदपत्रांची यादी पाहूनच नको त्या फंदात पडायला, अशी काही सर्वसामान्य नागरिकांची प्रतिक्रिया असते. परंतु म्हाडाने आता कागदपत्रांची संख्या २१ वरून कमी करून केवळ सहा कागदपत्रांवर आणत ही प्रक्रिया सोपी केली आहे. विशेष म्हणजे ॲपच्या सोबतीने ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) अंतर्गत गरीब, मध्यम आणि उच्च गटांमधील नागरिकांसाठी विविध गृहनिर्माण योजना राबविण्यात येतात. म्हाडाच्या सोडत प्रक्रियेमध्ये आतापर्यंत सोडतीनंतर अर्जदाराची पात्रता निश्चित करण्यात येत होती. अर्ज भरताना २१ कागदपत्रे जोडणे अनिवार्य होते. शिवाय, मानवी पद्धतीने पात्रता पडताळणी केली जात होती. त्यामुळे सोडतीपासून सदनिकेचा ताबा घेण्यापर्यंत प्रदीर्घ काळ लागत होता. परिणामी लॉटरी लागलेल्या व्यक्तीस मनस्ताप होण्यासोबतच म्हाडाला मिळणाऱ्या उत्पन्नावरही होत होता. तसेच, म्हाडाची घरे रिकामी राहत असल्याचे निरीक्षणात समोर आले होते. त्यामुळे आता म्हाडाने ही सर्व प्रक्रिया एका ॲपद्वारे आणि कमी कागदपत्रांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

अशी असेल नवीन प्रक्रिया
नव्या पद्धतीनुसार अर्जदाराची पात्रता आता सोडतीपूर्वीच ऑनलाइन पद्धतीने करण्यात येईल. यासाठी केवळ सहा कागदपत्रांची आवश्यकता असेल. अर्जदाराच्या अर्जाची जलद आणि अचूक पडताळणी करण्यात येईल. ॲप प्रणालीने पात्र केलेल्या अर्जदारांचाच सोडतीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे आता डीजी लॉकरमध्ये सुरक्षित राहतील. तसेच, सोडतीनंतर निकाल एसएमएस, इ-मेलद्वारे आणि ॲपमध्ये तत्काळ उपलब्ध होणार आहे.

आवश्यक कागदपत्रे
१. ओळखपत्र पुरावा
आधारकार्ड (आधारकार्ड मोबाइलशी संलग्न असावा.) आधारकार्डवरील पत्ता हा सध्याच्या पत्त्यापेक्षा वेगळा असल्यास अर्जदाराने सध्याचा पत्ता नमूद करणे आवश्यक आहे.

२. पॅनकार्ड

३. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र
तहसीलदार यांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र (अधिवास प्रमाणपत्र चालू पाच वर्षांमधील अनिवार्य आहे. त्यावर क्यूआर कोड असणे आवश्यक आहे.)

४. स्वतःच्या उत्पन्नाचा पुरावा
प्राप्तीकर परतावा प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला
किंवा विवाहित असल्यास - पती/पत्नीच्या उत्पन्नाचा पुरावा
पती/पत्नीचे प्राप्तीकर परतावा प्रमाणपत्र (नोकरी असल्यास)
किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा पुरावा.

५. जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र
तसेच इतर प्रवर्गानुसार प्रमाणपत्र

६. स्वघोषणापत्र

नवीन ॲप प्रणालीमुळे म्हाडाची सोडत प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होणार आहे. येत्या पाच जानेवारी रोजी पाच हजार ३२८ सदनिकांसाठी सोडतीचा प्रारंभ होणार आहे. या योजनेपासूनच ॲपद्वारे अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. सोडतीमध्ये नंबर लागल्यास संबंधित व्यक्तीने पुढील प्रक्रिया मुदतीत पूर्ण करणे अनिवार्य राहील. विलंब केल्यास मुदतवाढ मिळणार नाही.
- नितीन माने पाटील, मुख्याधिकारी, म्हाडा