Mantralay
Mantralay Tendernama
पुणे

MHADA : ZP भरतीनंतर आता MHADA भरतीबाबतही सरकारने घेतला 'हा' निर्णय

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : राज्यातील जिल्हा परिषद भरतीबरोबरच (ZP Bharti) महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा - MHADA) भरतीचे अतिरिक्त शुल्क उमेदवारांना परत करण्यात येणार आहे. यासंबंधीचा आदेश जिल्हा परिषदांना दिला असून, म्हाडा भरतीच्या अतिरिक्त शुल्क परताव्या संदर्भातही महाव्यवस्थापक तुषार मठकर यांनी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

२०१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या भरतीतील २१ कोटी ६७ लाख रुपये विद्यार्थ्यांना परत मिळणार असून, याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केली होती. आता त्यासंबंधीचे परिपत्रक काढले आहे.

राज्य सरकारने जिल्हा परिषदांमधील १८ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मार्च २०१९ आणि ऑगस्ट २०२१ मध्ये महाभरतीची घोषणा करत प्रकिया सुरू केली होती. त्यामुळे या दोन्ही जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांनी परीक्षा शुल्कासह उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्याने ही महाभरती रद्द करण्यात आली. मात्र, कोट्यवधी रुपये परीक्षा शुल्क सरकारच्या तिजोरीत जमा झाले होते.

पण भरती रद्द होऊनही विद्यार्थ्यांना शुल्क परत मिळाले नाही. आता हा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषद उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावर अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे.

म्हाडा अतिरिक्त शुल्क करणार परत

म्हाडा भरतीमध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी एक हजार रुपये शुल्काबरोबरच १८० रुपये जीएसटी रक्कम भरली होती. तर इतर प्रवर्गातील उमेदवारांनी ९०० रुपये शुल्काबरोबर १६२ रुपये जीएसटी शुल्क भरले होते. या उमेदवारांना आता जीएसटी शुल्क परत मिळणार असून, शासनाच्या नियमानुसार अतिरिक्त शुल्क परत करणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. उमेदवाराच्या बॅंक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे.

जिल्हा परिषद भरतीची आकडेवारी...

जिल्हा परिषद संख्या : ३४

खुल्या वर्गासाठी परीक्षा फी : ५०० रुपये

आरक्षित वर्गासाठी : २५० रुपये

जिल्हा परिषदांकडे वर्ग केलेली परीक्षा शुल्क : २१ कोटी ७० लाख