पिंपरी (Pimpri): उद्योगनगरीच्या पश्चिम पट्ट्यात अर्थात वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी या भागासह लगतच्या जांबे, सांगवडे, मामुर्डी, नेरे, गहुंजे, कासारसाई भागांत मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारले जात आहेत.
हा भाग पुणे - मुंबई द्रुतगती मार्ग आणि मुंबई - बंगळुरू महामार्गामुळे (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) जोडला आहे. त्यात आता रिंगरोड बरोबरच मेट्रो मार्गाची भर पडणार असून पुणे - मुंबई महामार्गावरील निगडी आणि पुणे - नाशिक महामार्गावरील भोसरी, मोशी, चाकणला ‘कनेक्टिव्हिटी’ वाढणार आहे.
पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी मार्गाचा निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत विस्तार होत आहे. आता भक्ती - शक्ती चौकापासून मुंबई - बंगळुरू महामार्गावरील किवळे, पुनावळे, ताथवडे, वाकड आणि पुणे - नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा (कासारवाडी), भोसरी, मोशी, चाकण मेट्रो मार्ग नेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत.
पिंपळे निलखमधील विशालनगर, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव मार्गे ही मेट्रो मार्गिका असेल. तिचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) महामेट्रोने महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे. या मार्गामुळे शहरातील सुमारे ७५ टक्के भाग विशेषतः पश्चिम पट्ट्यातील वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी या भागांसह लगतची जांबे, सांगवडे, मामुर्डी, नेरे, गहुंजे, कासारसाई गावे मेट्रोने जोडली जाणार आहेत.
निगडीपासून किवळे, वाकड मार्गे चाकण हा मेट्रो मार्ग सुमारे ४० किलोमीटर लांबीचा असेल. त्यामुळे हिंजवडी - पुणे मेट्रो मार्ग वाकडमधील भुजबळ चौकात आणि स्वारगेट - पिंपरी मेट्रो मार्गावरील नाशिक फाटा येथे जोडला जाईल.
निगडी-चाकण मेट्रोचे फायदे
- पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, वाहतूक आणि भविष्यातील वाहतूक कोंडी सुटेल
- भक्ती-शक्ती चौक ते चाकण मार्ग औद्योगिक, शैक्षणिक आणि निवासी दृष्टिकोनातून महत्त्वाचे
- मेट्रोचा विस्तार परिसराच्या सर्वांगीण विकासात उपयुक्त ठरेल
- दैनंदिन वाहतूक कोंडी सुटून सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम होईल