Electric Vehicle
Electric Vehicle Tendernama
पुणे

Pune : तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहन आहे, मग चार्जिंगसंदर्भात हे वाचाच...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहन आहे...ते तुम्ही घरगुती विजेतूनच चार्जिंग करीत असाल तर तुम्हाला वीजबिलाचा मोठा फटका बसू शकतो. त्यावर महावितरणने एक उपाय उपलब्ध करून दिला आहे. अशा वाहनांच्या चार्जिंगसाठी स्वतंत्र वीजमीटर घ्या. त्यासाठी सवलतीचा वीजदर असून कोणतेही स्लॅब नाही. चार्जिंगसाठी कितीही वीज वापरा, दर प्रतियुनिटचा दर तोच राहणार आहे. त्यामुळे तुमचा फायदा होऊ शकतो.

प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना विविध मार्गांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. त्याच एक भाग म्हणून महावितरणकडून देखील अशा वाहनांच्या चार्जिंगसाठी स्वतंत्र वीजमीटर आणि सवलतीचा वीजदर लागू करण्यात आला आहे. आतापर्यंत पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात मिळून सुमारे २०० स्वतंत्र वीजमीटर महावितरणकडून देण्यात आले आहे. त्यामध्ये वैयक्तिक वीजमीटर घेणाऱ्यांची संख्या कमी आहे.

सिंगल फेज मीटर उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज केल्यानंतर महावितरणकडून सुमारे १२६ फिक्स चार्जेस आकारून ते उपलब्ध करून दिले जाते. मात्र, इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगासाठी स्वतंत्र वीजमीटरसाठी अर्ज केल्यानंतर ७५ रुपये फिक्स चार्जेस आकारले जातात. तसेच वाहनांच्या चार्जिंगसाठी सहा रुपये आठ पैसे प्रतियुनिट, तर वहन चार्जेस एक रुपये १७ पैसे या दराने वीजपुरवठा केला जातो. तसेच कितीही वीज वापरली तरी वीजबिलाची आकारणी या एकाच दराने केली जाते. या उलट घरगुती वापरासाठी शून्य ते शंभर, शंभर ते दोनशे आणि दोनशेच्या पुढील युनिटसाठी वेगवेगळा वीजदर लावला जातो. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वतंत्र वीजमीटर घेणे फायदेशीर ठरते.

इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी स्वतंत्र वीजमीटर घेतल्यास त्यासाठी सवलतीचा वीजदर आकारला जातो. त्यामुळे नागरिकांना येणाऱ्या वीजबिलात बचत होण्यास मदत होते. तसेच घरगुती अथवा वाणिज्यसाठी वीजदराचे स्लॅब आहेत. त्यामुळे एवढे युनिट तुमचा वीजवापर होतो. त्यानुसार स्लॅब बदलतो आणि विजेचा दरही बदलतो. या उलट वाहनांच्या चार्जिंगसाठी कितीही युनिट वीजवापर केला, तरही एकच दर लागतो. त्यामुळे नागरिकांनी या योजनेचा फायदा घ्यावा.

- निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण

वापर वाढतोय सहा पटीहून अधिक

- २०२० मध्ये पुणे शहरात केवळ एक हजार ४५० इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी

- २०२१ मध्ये त्यामध्ये वाढ होऊन सहा हजार २१९ वाहनांची नोंदणी

- गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) खरेदीमध्ये प्रचंड वाढ

- मे २०२२ पर्यंत पुणे ‘आरटीओ’ कार्यालयात आठ हजार २२० वाहनांची नोंदणी

- २०२०च्या तुलनेत २०२२ मध्ये साधारणपणे सहा पटीने खरेदी वाढली

- पुण्यात २०११ पासून ते आतापर्यंत दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांची संख्या १८ हजार ३६७

- चारचाकी वाहनांची संख्या एक हजार ९०२ इतकी