Pune
Pune Tendernama
पुणे

Pune : कात्रज-कोंढवा रस्त्याचा भार कमी करणारा रस्ता टेंडर मंजूर होऊनही रखडलेलाच

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडले असताना या रस्त्याला पर्यायी आणि खडी मशीन चौकातील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी उपयुक्त असलेल्या टिळेकरनगर-येवलेवाडी रस्त्याचे कामही भूमिपूजनानंतर पुन्हा एकदा रखडले आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने या रस्त्याच्या कामासाठी १८ कोटी २९ लाख २० हजार रुपयांचे टेंडर मंजूर केले. मात्र, खड्डे बुजविण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

कात्रज, कोंढवा, उंड्री, पिसोळी या दक्षिण पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर आहे. यामध्ये स्थानिक वाहनांसह राज्य-परराज्यांतून येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या मोठी आहे. महापालिकेने कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम सुरू केले. पण, पाच वर्षांनंतरही हा रस्ता अर्धवट आहे. त्यामुळे वारंवार अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. कात्रज-कोंढवा रस्त्यासह या भागात टिळेकरनगर-येवलेवाडी रस्ता महत्त्वाचा आहे. मात्र, राजकारणातून त्याचे यापूर्वी दोन वेळा भूमिपूजन करण्यात आले. पण, नागरिकांना अद्यापही दिलासा मिळाला नाही.

वर्षात रस्ता पूर्ण होण्याचा दावा

इस्कॉन मंदिर चौकाजवळून येवलेवाडीला जाणारा रस्ता अरुंद आहे. तो अर्धवट विकसित झाल्याने नागरिकांसाठी गैरसोयीचा आहे. खडी मशीन चौकाकडून पानसरेनगर, येवलेवाडीला जाणे अवघड जात असल्याने हा पर्यायी रस्ता येवलेवाडीच्या रहिवाशांसाठी सोयीचा आहे. हा रस्ता खडी मशिन चौकाकडून बोपदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याला समांतर असल्याने खडी मशीन चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत होणार आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यात काम सुरू केले; पण अवघे २०० फूट लांबीचे काम झाले. त्यानंतर हे काम हाती घेण्यात आले नाही. त्यानंतर या रस्त्यांच्या कामासाठी २२ कोटींचे पूर्वगणनपत्रक तयार केले. त्यासाठी मे. साईप्रभा कन्स्ट्रक्शनची १८ कोटी २९ लाख २० हजार रुपयांची निविदा आली. त्यास स्थायी समितीने मे महिन्यात मान्यता दिली. हा रस्ता दोन किलोमीटर लांब आहे, त्यापैकी एक हजार ४०० मीटर लांबीचा रस्ता २४ मीटर रुंद आहे, तर उर्वरित ६०० मीटर रस्ता १० मीटरचा आहे. स्थायीच्या मान्यतेनंतर एका वर्षात हा रस्ता पूर्ण होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला होता.

ठिकठिकाणी खड्डे

रस्त्याच्या कामात पावसाळी गटारांसह इतर सुविधा केल्या जाणार आहेत. सध्या पावसाळी गटारांचे काम सुरू आहे. त्यानंतर डांबरीकरण केले जाणार आहे. पण पावसाळ्यात या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडून पाणी तुंबत असले, तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांना या रस्त्याने आदळत प्रवास करावा लागत आहे.

टिळेकरनगर-येवलेवाडी रस्त्याच्या कामाचे टेंडर मंजूर झाल्यानंतर पावसाळी गटार टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानंतर डांबरीकरणाचे काम सुरू केले जाईल. या रस्त्यावरील खड्डे लगेच बुजवून घेतले जातील.

- साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग