PMC
PMC Tendernama
पुणे

बेकायदा कामामुळे पुणे महापालिकेला पाठविले लाखोंचे बिल; बिल पाहून..

Sachin

पुणे (Pune) : बेकायदा जाहिराती लावल्याबद्दल किंवा खासगी मिळकतींवर विनापरवाना रंगरंगोटी केली तर, महापालिका कारवाई करते. परंतु, हीच चूक महापालिकेने केली तर? सजग पुणेकर महापालिकेला सोडतील का?, शक्यच नाही ! सोसायटीची सीमाभिंत जाहिरातींसाठी बेकायदा रंगविली म्हणून कोथरूडमधील स्वप्नशिल्प सोसायटीने महापालिकेला १६ लाख रुपयांचे बिल पाठविले. त्यामुळे नरमलेल्या महापालिकेने सीमा भिंत पूर्ववत करून देण्याचे लेखी आश्वासन दिले आणि आपली चूकही कबूल केली.

कोथरूडमध्ये गुळवणी महाराज रस्त्यावर सिटी प्राईडजवळ ४८३ सदनिकांची ‘स्वप्नशिल्प’ सोसायटी आहे. या सोसायटीच्या सीमाभिंतीवर महापालिका गेल्या पाच-सात वर्षांपासून जाहिराती रंगवते. महापालिकेने १५ दिवसांपूर्वी आकाशचिन्ह धोरण जाहीर केले. त्यात इतर मुद्द्यांबरोबरच भिंतीवर विनापरवाना रंगरंगोटी केल्यास कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. त्याची दखल घेऊन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. महापालिका आपल्या सोसायटीच्या सीमा भिंतीवर गेली अनेक वर्षे विनापरवाना जाहिराती रंगवीत असल्याबद्दल काही तरी केले पाहिजे, असे त्यांचे ठरले. त्यानुसार सोसायटीचे अध्यक्ष दिलीप देशपांडे यांनी २२ डिसेंबर रोजी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना पत्र पाठविले. ‘सोसायटीची परवानगी न घेता अनेक वर्षे महापालिका जाहिराती रंगविते. आकाशचिन्ह विभागाच्या दरांनुसार महापालिकेने बिलापोटी १६ लाख रुपये द्यावेत,’ असेही त्यात म्हटले. त्यानंतर सोसायटीचे पदाधिकारी आयुक्तांना त्यासाठी भेटले. त्याची दखल आयुक्तांनी घेतली.

सोसायटीला पाठविले पत्र
वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय आयुक्त राजेश गुर्रम यांनी दोन दिवसांपूर्वी सोसायटीला पत्र पाठविले. त्यात म्हटले आहे की, ‘‘जाहिरातींद्वारे उत्पन्न कमविण्याचा महापालिकेचा उद्देश नव्हता. राज्य सरकारच्या धोरणानुसार जनजागरूकता निर्माण करण्यासाठी या जाहिराती करण्यात आल्या. महापालिकेकडे सध्या निधीची कमतरता आहे. तो उपलब्ध झाल्यावर सोसायटीची भिंत पूर्ववत केली जाईल.’’