Pune, PMC Tendernama
पुणे

प्रशासनातील सावळ्या गोंधळामुळे पुणे शहराचे बकालपण वाढतेय का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : प्रशासनातील सावळा गोंधळ आणि नागरिकांच्या कमी सहभागामुळे सार्वजनिक ठिकाणी कचरा वाढून शहर अस्वच्छ होत आहे. त्यामुळे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांनी कार्यकाळातील पहिला उपक्रम शहर स्वच्छतेचा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यादृष्टिने त्यांनी पावले टाकण्यास प्रारंभ केला.

शहरातील सामाजिक संस्था, संघटना, नागरिकांच्या सक्रिय सहभागाने ‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या धर्तीवर महिनाभरात ‘स्वच्छ पुणे’ अभियान राबवू, यावेळी प्रशासकीय सुधारणाही करू, असे यांनी सांगितले. त्यादृष्टिने महापालिकेने आज स्वयंसेवी संस्थांसमवेत बैठक घेतली.

अतिरिक्त आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन, पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्यासह रोटरी क्लब, इकोएक्झिस्ट, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था, पुणे रिटेल असोसिएशन, व्यापारी संघ, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, पुणेरी नायक, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, एनएससीसी, यार्दी, पुनरावर्तन, क्रेडाई, ज्वेलर्स असोसिएशन, लोढा फूड प्रॉडक्ट डीलर्स या संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

शहर बकाल होत असून प्रशासनाला स्वच्छतेचा प्रश्‍न हाताळताना अपयश येत आहे. महापालिका भवनातून शहर स्वच्छतेबाबत अनेक आदेश जात असले तरी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर अंमलबजावणीचे प्रमाण नगण्य आहे. कचरा व्यवस्थापनातील त्रुटी समोर आल्यानंतर आता आयुक्त राम यांनीही स्वच्छ पुणे अभियान राबविण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासकीय सुधारणांसह शहर स्वच्‍छतेला वेग येण्याची शक्यता आहे.

या बैठकीत कचरा वर्गीकरणाचे प्रमाण १०० टक्के करणे, होम कंपोस्टिंग वाढवणे, बल्क वेस्ट जनरेटर्समार्फत कचरा प्रक्रिया, वस्ती पातळीवर जनजागृती, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे, दृश्यमान स्वच्छता, झिरो गार्बेज उपक्रम राबविणाऱ्या सोसायटी यांसह अन्य मुद्द्यांवर आयुक्तांनी चर्चा केली. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग वाढवण्यास मदत होऊ शकते.

पत्रकारांशी बोलताना आयुक्त म्हणाले, ‘‘शहरात कचऱ्याचे ढीग कायम दिसतात. सार्वजनिक ठिकाणी कचरा वाढत आहे. त्यासाठी नागरिकांच्या सहभागाने स्वच्छ पुणे अभियान राबवू. त्याचे नियोजन महिन्याभरात होईल. प्रशासन कुठे कमी पडत आहे, त्यात सुधारणा करू. चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्यावर नियंत्रण आणले जाईल.’’

त्रुटी दूर करण्याचे आव्हान
पुणे महापालिका ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी दरवर्षी शहरात नागरिकांच्या सहभागाने विविध उपक्रम राबविते, पण त्याचा परिणाम खूप कमी कालावधीसाठी होता. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर स्वच्छता हे प्रमुख काम असताना त्याकडे परिमंडळ आयुक्त, सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, निरीक्षक, मुकादम यांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बकालपणा वाढत आहे. स्वच्छतेच्या कामात एकमेकांच्या कामावर नियंत्रण महत्त्वाचे आहे, पण नियंत्रण करणारे अधिकारीच चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देत असल्याने शहर घाण होत आहे. नागरिकांचा सहभाग वाढला तरी या त्रुटी आयुक्तांना दूर कराव्या लागणार आहेत.