IT Sector
IT Sector Tendernama
पुणे

IT Sector: 'या' कारणांमुळे विदेशातून मिळणाऱ्या नव्या प्रकल्पांत घट

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रात मोठे योगदान असलेल्या देशांत झालेला कोरोनाचा (Covid 19) उद्रेक, रशिया-युक्रेनमधील युद्ध (Russia - Ukraine War) यामुळे देशात आणि खासकरून पुण्यात (Pune) परदेशातून येणाऱ्या आयटीमधील प्रकल्पांची (IT Projects) संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र, आता कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने आणि युद्धाची धग कमी झाल्याने परदेशातून येणाऱ्या या प्रकल्पांची पुन्हा संख्या कमी झाली आहे.

सध्या ज्या कंपन्यांना परदेशातील कंपन्यांचे प्रकल्प मिळत आहे, त्यांचे करार जून २०२० ते जून २०२२ दरम्यान झालेले आहेत. त्या तुलनेत आता नव्याने करार होण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने घटले आहे, अशी माहिती आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देण्यात आली.

काय झाला परिणाम?
- युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या देशांच्या गॅस, ऊर्जा पुरवठा धोरणांत रशियाकडून बदल
- त्या देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिमाण, आयटी क्षेत्रालाही फटका
- परिणामी, जगातील अनेक बड्या आयटी कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात
- आयटीचे प्रकल्प भारतात मिळण्यास याचा फायदा
- मात्र, सद्यस्थितीत युद्धाबाबतच्या रशियाच्या भूमिकेचा नकारात्मक परिणाम झाल्याची
नेसेन्ट इनफॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी एम्प्लाईज सिनेटची माहिती

परिस्थिती सुधारण्याचा तज्ज्ञांचा अंदाज
- स्वस्त मनुष्यबळ हे भारतात प्रकल्प मिळण्यामागील कारण
- अनेक कंपन्या परदेशात मात्र, त्याचे ९० टक्क्यांहून अधिक मनुष्यबळ भारतात
- देशातील आयटी क्षेत्राला वार्इट दिवस असल्याने भारतातील कामकाज मंदावले
- परदेशात मुख्यालय असलेल्या कंपन्यांना अधिक प्रकल्प मिळाले तर परिस्थितीत सुधारण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

प्रगतशील देशांत आर्थिक मंदी आली तर त्याचा परिमाण आपल्या देशात जाणवतो. सध्या नवे प्रकल्प येण्याची संख्या कमी झाल्याचे जाणवते. कारण आजही अनेक फ्रेशर्सला ऑफर लेटर देऊनही रुजू केलेले नाही. देशातील बड्या आयटी कंपन्यांच्या कर्मचारी भरतीचा आकडा तपासला असता आता गेल्या सहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात भरती झाली नसल्याचे दिसते.
- पवनजीत माने, सदस्य, राज्य आयटी कमिटी

गेल्या साडेचार वर्षांपासून मी अमेरिकेतील एका कंपनीकडून येणाऱ्या प्रकल्पांची जबाबदारी सांभाळत आहे. कोरोना काळात त्या कंपनीकडून मोठ्या संख्येने प्रकल्प आले. मात्र आता त्यांची संख्या कमी झाली आहे. त्याचे कारण विचारले असता, क्लायंटकडून असलेली मागणी घटल्याचे सांगण्यात आले. तिकडचे आर्थिक वातावरण स्थिर झाल्यानंतर परिस्थिती सुधारू शकते, असा अंदाज आहे.
- आयटी कंपनीतील टिम लिडर