Housing
Housing Tendernama
पुणे

किमती वाढल्याने पुण्यात घर खरेदीला ब्रेक; लोकांना हवीत 'अशी' घरे..

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कोरोनानंतर (Covid 19) प्रशस्त घरांच्या खरेदीला पुण्यात ग्राहकांकडून प्राधान्य दिले जात असल्याचे समोर आले आहे. साधारणपणे टू-बीएचके फ्लॅटच्या (2BHK Flat) खरेदीकडे पुणेकरांचा कल असल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे. त्यात बरोबर देशातील इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत पुण्यातील घर खरेदीत वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये विक्री झालेल्या एकूण सदनिकांपैकी ५३ टक्के सदनिका या टू-बीएचके असल्याचे एका सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

कोरोनानंतर घर खरेदीचा ट्रेंड बदलल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट होते. त्याच बजेटमध्ये किंवा अधिक पैसे खर्च करून मोठेच घर घेऊ अशी मानसिकता वाढली आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायिकही त्याच दृष्टीकोनातून प्रकल्पांचे नियोजन करीत आहेत. दरम्यान, बांधकाम खर्च वाढल्याने घरांच्या किमतीही वाढल्या आहेत. घर घेताना टू-बीएचके फ्लॅट खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. कुटुंबातील सदस्यांची वाढलेली संख्या, कोरोनानंतर बदललेली जीवनशैली, मोठ्या घराची निर्माण झालेली गरज हे पाहता पुण्यात घरांची खरेदी वाढल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील मालमत्तांच्या किमती २०२२ च्या एप्रिल ते जून या तिमाहीत वार्षिक पातळीवर नऊ टक्क्यांनी वाढल्या आहेत, असे प्रॉपटायगर डॉटकॉम आणि आरईए इंडिया यांच्या अहवालात नमूद आहे. रिअल इनसाइट रेसिडेन्शियल एप्रिल-जून २०२२ या अहवालानुसार देशातील प्रमुख शहरातील नवीन आणि विद्यमान मालमत्तेची किंमत ३० जून २०२२ नुसार ५,४००- ५,६०० प्रति चौ. फूट राहिली आहे. ही वाढ झाल्यानंतरही पुण्यातील मालमत्तांच्या किमती मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नई यांच्या तुलनेत कमी आहे.

मालमत्तेच्या किमतीतील मोठी वाढ आणि वाढत्या रेपो रेटचा पुण्यातील घर खरेदीदारांवर मोठा प्रभाव पडला आहे. हा प्रभाव हळूहळू कमी झालेल्या निवासी मालमत्तेच्या ठिकाणी मागणीत वाढ दिसते. रेपो रेट कोरोना आधीच्या स्थितीवर राहिले आहेत.

- विकास वाधवान, सीएफओ, हाउसिंग डॉटकॉम, प्रोपटायगर डॉटकॉम आणि मकान डॉटकॉम समूह

- जूनच्या तिमाहीत पुण्यातील विक्रीचा वेग घटला

- तीन महिन्यात १३,३९० घरे बाजारात, १३,७२० घरांची विक्री

- पुण्यात मुंबईनंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा विकला न गेलेला सर्वाधिक १,१७,९९० घरांचा साठा

- न गेलेला साठा विकण्यासाठी २५ महिने लागतील असा अंदाज