इंदापूर (Indapur) : शहरातील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत भुयारी गटार कामासाठी ६० कोटी ११ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामामुळे आगामी काळात शहरातील सांडपाण्याचा प्रश्न मिटणार आहे. तसेच, शहराच्या स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्यवस्थेत सुधारणा होणार आहे.
शहराची वाढती लोकसंख्या पाहता, तसेच भविष्यातील २०-३० वर्षाचा विचार करता शहरांमध्ये भुयारी गटार योजनेची क्षमता वाढवण्याची गरज होती. त्यानुरूप नगरपरिषदेकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावास निधी प्राप्त झाला आहे. याचे निविदा प्रक्रिया होऊन सध्या काम सुरू आहे. या भुयारी गटार योजनेअंतर्गत शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन केले जाणार असून, शहरातील सांडपाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. हे काम दोन वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा असून, शहरातील प्रत्येक नागरिकाच्या घरातील सांडपाणी या योजनेअंतर्गत जोडण्यात येऊन पुढे त्या पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानंतर ते पाणी नदी नाल्यांमध्ये सोडण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात दारासमोर, रस्त्यांवर किंवा मैदानांवर सांडपाणी वाहताना दिसणार नाही.
शहराच्या विकासासाठी केंद्र तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा विकास निधी उपलब्ध करून दिला जात आहे. भुयारी गटार योजनेसाठीच्या निधीच्या माध्यमातून शहरातील सांडपाण्याची योग्य व्यवस्था होणार आहे. यासह इतर विकासकामाच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम सुरू असून, इंदापूरकडे विकसित शहर म्हणून पाहिले जावे यासाठी प्रयत्नशील असून, विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही.
-दत्तात्रेय भरणे, क्रीडामंत्री.
शहरातील चौफेर विकासासाठी नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास योजना राबविण्यात आल्या. याचा परिणाम शहरांमध्ये प्रचंड विकासात्मक बदल झाला असून, आपल्या कार्यकाळात शहराचा विकास झाला याचे समाधान वाटते. सद्या सुरू असलेले भुयारी गटार योजना ही केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून, आरोग्य आणि पर्यावरणीय प्रगतीसाठी देखील महत्त्वाची आहे.
-अंकिता शहा, माजी नगराध्यक्ष, इंदापूर.
सांडपाण्याचा पुनर्वापर आणि जलसंधारण तसेच प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी, बागायतीसाठी किंवा औद्योगिक वापरासाठी उपयुक्त ठरेल. तसेच भविष्यात उघड्या नाले नसल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही. पावसाळ्यात साचलेले पाणी वेगाने वाहून जाईल. ज्या नागरिकांच्या भागांमध्ये अद्यापही सांडपाण्याची व्यवस्था झालेली नाही अशा नागरिकांनी नगर परिषदेची संपर्क साधावा.
-रमेश ढगे, मुख्याधिकारी, इंदापूर नगरपरिषद.