Pimpri Tendernama
पुणे

Pimpri : देहू, आळंदीतील यात्रांसाठी येणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासाची आता स्वतंत्र व्यवस्था

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : देहू, आळंदी येथील यात्रांसह इतर मोठ्या कामकाजासाठी बाहेरील जिल्ह्यांमधून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासाची आता स्वतंत्र व्यवस्था केली जाणार असून त्यादृष्टीने देहूरोड पोलिस ठाण्याजवळील जागेवर लवकरच विश्रामगृह बांधण्यात येणार आहे. त्यामध्ये १८० ते २०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सोय करणे प्रशासनाला शक्य होणार आहे. मे २०२६ पर्यंत त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन केले जात आहे.

कायदा- सुव्यवस्था राखण्यासह, निरनिराळ्या प्रकारचे शासकीय कामकाज आणि धार्मिक यात्रांसाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला अनेकदा बाहेरील जिल्ह्यांमधून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागवावा लागतो. मात्र, त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था नसल्याने मंगल कार्यालये, भक्त निवास अथवा लॉजमध्ये त्यांना राहावे लागते. तेथे बऱ्याच वेळेला त्यांची गैरसोय होते. त्यामुळे, आता बंदोबस्तासाठी बाहेरगावावरुन येणाऱ्या अधिकारी, अंमलदारांच्या निवास व्यवस्थेसाठी पोलिस आयुक्तालयाकडून लवकरच स्वतंत्र इमारत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. देहूरोड सेंट्रल चौक येथील देहूरोड पोलिस ठाण्याजवळ असलेल्या सेंट ज्यूड शाळेसमोरील पोलिस विभागाच्या जागेवर देहू-आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत हे विश्रामगृह बांधण्यात येणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून बांधकामासाठी टेंडरही प्रसिद्ध झाल्या आहेत.

कोणत्या कामांसाठी बंदोबस्त?

- देहू, आळंदी यात्रा

- आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा

- देहूतील तुकाराम बीज सोहळा

- गहुंजेतील क्रिकेट स्टेडियमवरील सामने

- विविध प्रकारच्या निवडणुका

- अतिमहत्वाच्या व्यक्तींचे दौरे

असे असेल विश्रांतीगृह

- तीन मजली इमारत

- वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी दहा खोल्या

- एकूण ३० खोल्या

- एका खोलीमध्ये सहा अंमलदारांच्या निवासाची सोय

- अंमलदार निवासस्थान क्षेत्र - १ हजार ०४८ चौरस मीटर

- अधिकारी विश्रामगृह क्षेत्र - ७२० चौरस मीटर

बाहेरून बंदोबस्तासाठी येणाऱ्या अधिकारी, अंमलदारांच्या निवासाची व्यवस्था नसल्याने त्यांना मंगल कार्यालये, भक्त निवास येथे राहावे लागते. त्यामुळे त्यांच्या निवासासाठी विश्रांतीगृहाची आवश्यकता होती. आता ही इमारत लवकरच उभी राहणार असून त्याने अधिकारी, अंमलदारांची चांगली सोय होणार आहे.

- विकास राऊत, पोलिस निरीक्षक, पिंपरी-चिंचवड